कोल्हा'पूर'नंतर चंद्र'पूर', गडचिरोलीतही पाणीच पाणी; अनेक गावांचा संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 10:18 AM2019-08-14T10:18:52+5:302019-08-14T10:42:05+5:30
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम भागातील अनेक गावे, वस्त्या, पाडे, जनसंपर्कापासून तुटले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम भागातील अनेक गावे, वस्त्या, पाडे, जनसंपर्कापासून तुटले आहेत. बुधवारी सकाळी अहेरी तालुक्यातून नागपूर व चंद्रपूरकडे जाणाऱ्या बसगाड्या पुलावरून पाणी वाहत असल्याने आष्टी येथे रोखण्यात आल्या होत्या. मंगळवारी आष्टी चामोर्शी मार्गावर असलेल्या नाल्यावरील पु
वरून पाणी जात असल्याने हा मार्ग बंद झाला होता.
लाहेरीपासून २ कि.मी. अंतराव असलेल्या गुंडेनूर, व्होड्री या गावांना नाल्यावर पूल नसल्याने येथील नागरिक अडकून पडले आहेत. येथील तहसीलदार कैलास अंडील यांनी या दोन्ही गावांसाठी लाकडी बोटीची सोय करून दिली. गडचिरोलीहून नागपूरकडे येणारे सर्व प्रवासी जागीच अडकले आहेत.
कालपर्यंत काय होती परिस्थिती?
हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज खरा ठरत गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली. गडचिरोली तालुक्यात मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत सुमारे १२६ मिमी पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली. रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले. अनेकांच्या घरांमध्ये पाणी जमा झाले. त्यामुळे गडचिरोली शहरातील काही भागात पूरजन्यपरिस्थिती निर्माण झाली होती.
तीन दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा सोमवारच्या रात्री व मंगळवारी दुपारपर्यंत जिल्ह्याला झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहू लागले. काही नाले व नद्यांवरील पुलांवर पाणी चढले होते. त्यामुळे अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले. सखल भागात असलेल्या शेतांमध्ये पाणी साचले.