गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात पूरस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2022 08:07 PM2022-07-09T20:07:05+5:302022-07-09T20:07:33+5:30
Gadchiroli News गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील अनेक तालुक्यांमध्ये गेल्या दोन दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.
गडचिरोली : जिल्ह्याच्या दक्षिण भागातील अनेक तालुक्यांमध्ये गेल्या दोन दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही प्रमुख मार्गांसह ग्रामीण भागातील नदी-नाल्यांवरच्या पुलावरून पाणी वाहत आहे, त्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प पडली आहे.
आलापल्ली ते भामरागड (हेमलकसा) मार्गावरच्या कुमरगुडा नाल्यावरील तात्पुरता रपटा तीन दिवसांपूर्वी वाहून गेल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात प्रशासनाला यश आले नाही. शनिवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार २४ तासांत जिल्ह्याच्या दक्षिण भागातील भामरागड तालुक्यात १४१.४ मिमी, सिरोंचा ११७.४ मिमी, अहेरी ५६.५ मिमी तर एटापल्ली तालुक्यात ५२.८ मिमी पाऊस झाला. अहेरी, एटापल्ली, भामरागड तालुक्याच्या दुर्गम भागातील अनेक गावांमध्ये पाणी साचले असून, घरांना पाण्याचा वेढा पडला आहे. सिरोंचा तालुक्यातील अनेक छोट्या नाल्यांना पूर आल्यामुळे छत्तीसगडकडे जाणारा मार्गही बंद झाला आहे.