पुरामुळे शंभरावर गावे संपर्काबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 11:20 PM2018-08-12T23:20:47+5:302018-08-12T23:21:10+5:30
पर्लकोटा नदीच्या पाण्याची पातळी रविवारी दुपारी वाढली. पुराचे पाणी भामरागड शहरात शिरल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. भामरागडसह जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली/भामरागड : पर्लकोटा नदीच्या पाण्याची पातळी रविवारी दुपारी वाढली. पुराचे पाणी भामरागड शहरात शिरल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. भामरागडसह जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.
भामरागड तालुक्यातील पर्लकोटा, पामुलगौतम व इंद्रावती या नद्या छत्तीसड राज्यातून वाहतात. शनिवारी छत्तीसगडमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे तिन्ही नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली. पर्लकोटा ही नदी भामरागड शहराच्या अगदी जवळून वाहते. तिन्ही नद्यांचे भामरागडजवळ संगम सुध्दा आहे. तिन्ही नद्यांच्या पाण्याची पातळी वाढल्याने पर्लकोटा नदी पर्लकोटा नदीला दाब निर्माण झाली. त्यामुळे पर्लकोटा नदीचे पाणी शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास पूलावर चढले. अचानक पाणी वाढल्याने नागरिकांमध्ये खळबळ माजली. सामान इतरत्र हलविण्याची धडपड रात्रभर सुरू होती. १२ वाजता भामरागड चौकातून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जाणाऱ्या मार्गावर कंबरभर पाणी जमा झाले होते. मात्र पहाटे ४ वाजताच्या सुमारास नदीचे पाणी कमी होण्यास सुरूवात होऊन सकाळी ७ वाजता पूल मोकळा झाला. त्यानंतर पुन्हा रविवारी सकाळी १० वाजता पाणी वाढण्यास सुरूवात झाली. दुपारी १२ वाजतानंतर भामरागडातील चौकात पाणी जमा होऊ लागले. सायंकाळपर्यंत पूर्ण चौक पुराच्या पाण्याने व्यापला होता. सायंकाळी उशीरापर्यंत पाण्याची पातळी वाढतच होती. त्यामुळे भामरागड शहरातील नागरिकांमध्ये खळबळ माजली होती. पर्लकोटा नदी पुलावर पाणी चढल्याने भामरागड तालुक्यातील ८० गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. भामरागड-आरेवाडा नाल्यावर पाणी असल्याने या परिसरातील १० गावांचा भामरागड तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. तर भामरागड-कोठी, हेमलकसा-आलापल्ली मार्गावरील बांडीया नाल्यावरील पुलावर पाणी जमा झाले होते. पूर परिस्थिती असताना पूल ओलांडू नये, तसेच कोणीही सेल्फी काढू नये, यासाठी एसडीपीओ तानाजी बरडे, ठाणेदार सुरेश मदने यांच्या नियंत्रणात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तसेच तहसीलदार कैलास अंडील यांनी सुध्दा परिस्थितीवर नियंत्रण ठेवले होते.
जिमलगट्टा : जिमलगट्टा नाला भरून वाहत असल्याने देचलीपेठा परिसरातील जवळपास १० गावांचा संपर्क तुटला आहे. पेरमिली : आलापल्ली-भामरागड मार्गावरील पेरमिलीजवळच्या नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत होते. यामुळे धान शेतीचेही पुराचे पाणी शेतीत शिरल्याने धान पिकाचेही नुकसान झाले. झिंगानूर : झिंगानूरपासून आठ किमी अंतरावर असलेल्या कोपेला नाल्यावर पाच ते सहा फूट पाणी जमा झाले आहे. या नाल्यावर पूल नाही. पावसाळ्यात एक पाऊस झाल्यानंतर सदर मार्ग बंद होतो. आसरअल्ली, अंकिसा, सोमनपल्ली, सिरोंचा, सोमनूर, गुमालकोंडा, मुत्तापूर गावांकडे जाणारे मार्ग बंद झाले.
सिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील बामणी व टेकडाताला नाल्यावर पाणी असल्याने या भागाचाही संपर्क तुटला होता.