प्राणहिता नदीचा प्रवाह अडविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:43 AM2018-05-14T00:43:14+5:302018-05-14T00:43:14+5:30
अहेरीजवळील वांगेपल्ली घाटावरून गुडेमपर्यंत तयार होणाऱ्या आंतरराज्यीय पूल बनवित असताना पाण्याचा प्रवाह अडविल्याने प्राणहिता नदीचा प्रवाह खंडीत झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : अहेरीजवळील वांगेपल्ली घाटावरून गुडेमपर्यंत तयार होणाऱ्या आंतरराज्यीय पूल बनवित असताना पाण्याचा प्रवाह अडविल्याने प्राणहिता नदीचा प्रवाह खंडीत झाला आहे.
तेलंगणा व अहेरीला जोडण्यासाठी प्राणहिता नदी घाटावर मागील दोन वर्षांपासून आंतरराज्यीय पुलाचे काम सुरू आहे. पुलावर काम करणाऱ्या ट्रक व इतर साधनांना ये-जा करता यावी, यासाठी कंत्राटदाराने पुलाच्या खालून लहान पूल तयार केला होता. या लहान पुलाच्या खालून पाणी जात होते. मात्र तीन दिवसांपूर्वी कंत्राटदाराने लहान पूल पूर्णपणे बुजवून नदीचा प्रवाह पूर्णपणे ंबंद केला आहे.
यापूर्वी अहेरीच्या बाजुने पाण्याची धार होती. कंत्राटदाराने सदर धार पोकलँड मशीनच्या सहाय्याने ही धार नदीच्या मध्यभागी केली. त्यामुळे अहेरी पाणी पुरवठा योजनेला कमी प्रमाणात पाणी पुरवठा होण्यास सुरूवात झाली होती. आता तर पूर्णच धार बंद केल्याने पाणी पुरवठा योजना अडचणीत आली आहे. अहेरी नगर पंचायत यावर नेमकी कोणती भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे. भविष्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होणार आहे.
पाणी पुरवठा योजना अडचणीत
प्राणहिता नदीवर अहेरीसह अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना आहेत. मात्र या नदीचा प्रवाह बदलला. त्याचबरोबर आता प्रवाहच बंद केला आहे. त्यामुळे या नदीवर असलेल्या पाणी पुरवठा योजनांना पाणी मिळण्यास अडचण निर्माण होणार आहे. जिल्हा प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष घालून नदीचा प्रवाह अडविण्यावर प्रतिबंध घालावा, अशी मागणी आहे.