रहस्यमय हत्येने हादरून गेला फुले वॉर्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:26 AM2021-06-25T04:26:15+5:302021-06-25T04:26:15+5:30
मृत रायपुरे हे अविवाहित होते. गजबजलेल्या फुले वाॅर्डात ते आपल्या वडिलोपार्जित घरात एकटेच राहात होते. त्यांच्या घराला लागूनच त्यांच्या ...
मृत रायपुरे हे अविवाहित होते. गजबजलेल्या फुले वाॅर्डात ते आपल्या वडिलोपार्जित घरात एकटेच राहात होते. त्यांच्या घराला लागूनच त्यांच्या भावाचे घर आहे. तेथूनच त्यांना दररोज जेवण दिले जात होते. समाजकार्याची त्यांना आवड असल्याने कोणाच्याही कामासाठी ते धावून जात होते. ४ वर्षापूर्वी लोकांच्या आग्रहास्तव त्यांनी नगर परिषदेची निवडणूकही लढली होती; पण त्यांचा पराभव झाला. त्यांनी पार्टनरशिपमध्ये प्लॉटिंगचा व्यवसाय सुरू केल्याने त्यांच्याकडे पैसेही राहात होते.
दरम्यान, बुधवारी रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे भावाच्या घरून आलेले जेवण घेतले. सकाळी त्यांच्या घराचे दार उघडे होते, पण ते बाहेर आले नाहीत. आत जाऊन पाहिले असता, ते बेडवर मृतावस्थेत पडले होते. त्यांच्या पोटावर, मानेजवळ जखमा होत्या. तिक्ष्ण शस्त्राने त्यांच्यावर वार केले असण्याची शक्यता आहे.
(बॉक्स)
अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव
- या घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ प्रणिल गिल्डा, ठाणेदार प्रमोद बानबले यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि तपासासाठी दिशानिर्देश दिले. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. यावेळी घटनास्थळाच्या परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
- गडचिरोली शहरात नागरी वसाहतीत खुनासारख्या घटना क्वचितच घडतात. त्यातच या खुनाच्या घटनेत कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी किंवा सहज लक्षात येणारे कारण नसल्यामुळे या खुनाचे रहस्य उघडकीस आणणे पोलिसांसाठी आव्हान ठरले आहे. या घटनेचा तपास एपीआय शरद मेश्राम करीत आहे.
(बॉक्स)
दोन्ही श्वानांनी दाखवला एकच मार्ग
रायपुरे यांच्या घरात एक काठी, रूमाल आणि अनोळखी चप्पल आढळली. त्याआधारे विशेष प्रशिक्षित श्वानपथकाने आरोपींचा माग घेण्याचा प्रयत्न केला. एका श्वानाने आरमोरी मार्गाकडील शेतापर्यंतचा रस्ता दाखवला. त्या ठिकाणी तो श्वान घुटमळला. त्यानंतर दुसऱ्या श्वानाच्या माध्यमातून माग घेतला असता, त्यानेही तोच मार्ग दाखवला. त्यामुळे आरोपी तेथून एखाद्या वाहनाने पसार झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.