गडचिरोली जिल्ह्यात फुलतेय शेवग्याची शेती; भाजीपाला पिकवण्यावर शेतकऱ्यांचा भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 03:19 PM2020-06-17T15:19:15+5:302020-06-17T15:19:41+5:30
गडचिरोली जिल्ह्यात दिगंबर धानोरकर यानी आपल्या शेतात फक्त एका एकरमध्ये प्रयोगशील वृत्तीतून विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात असलेल्या वेल्तूर तूकूम (रिठ ) मध्ये उपक्रमशील शेतकरी दिगंबर धानोरकर यांनी शेवग्याची शेती केली आहे. या पिकाबाबत मार्गदर्शन घेत उत्पादन व त्याची विक्री व्यवस्थाही सक्षम करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. केवळ एक एकर शेती मध्ये ती अधिकाधिक विकसित करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे. गावातील एकूण शेतीचा विचार करता प्रामुख्याने बरेचसे शेतकरी आपआपल्या शेतात धान, कापूस, तूर, सोयाबीन इत्यादी पिकांचे उत्पादन घेत असतात. पण या गावात असेही शेतकरी आहेत की त्यानी आपआपल्या शेतात भाजीपाला लावलेले आहेत.. त्यामधे याच गावांतील असलेले दिगंबर धानोरकर यानी आपल्या शेतात फक्त एका एकर शेतामध्ये प्रयोगशील वृत्तीतून शेतीत विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे.
तत्पूर्वी या शेतकऱ्यांनी वेगवेगळे पीक घेण्याचाही प्रयोग केला. मात्र, मजुरांची टंचाई व दोन्ही पिकांतील उत्पादनातील व दरांतील जोखीम त्यांना मोठी वाटली. आर्थिकदृष्ट्या ही पिके परवडली नव्हती. आपण शेवगा पिकाचा प्रयोग करून पाहू या असे त्यांनी ठरवले. त्याचे बियाणेही त्यानी आणले. लागवडीपूर्वी शेवगा पिकाविषयी पुस्तकांतूनही ज्ञान घेतले. सर्वप्रथम त्यानी फक्त एकच एकर मध्ये शेवग्याची शेती करण्याचे ठरविले. त्यापद्धतीने त्यांनी शेवगा पिकाचे नियोजन करण्यात सुरुवात केली. डिसेंबर महिन्यात शेवग्याची सुमारे सहाशे झाडे लावण्यात आली. त्यासाठी अर्धा फूट खोल खड्डे खोदले. गांडूळ खत, शेणखत व गोमूत्र पासून बनविलेले औषध . मातीत चांगले मिसळून खड्डा भरला. त्याआधी त्यात थोडे फोरेट टाकले. बियाणे चार तास पाण्यात भिजवून त्यास कार्बेन्डाझिमची प्रक्रिया केली. प्रत्येक खड्ड्यात एक बियाणे लावले. बियाणे पाण्यात भिजवल्यामुळे बियाण्याची उगवण लवकर झाली. वाढीच्या सुरवातीलाच खते दिल्यामुळे झाडांची वाढ चांगली व निरोगी झाली. लागवडीपूर्वी खड्ड्यात गांडूळ खत, शेणखत व गोमूत्र पासून बनविलेले औषध यांचा वापर केला. शेवग्याची उगवण झाल्यानंतर 15 ते 20 दिवसांच्या अंतराने युरिया खत दिले.
अन्य पिकांच्या तुलनेत शेवगा पिकाची देखभाल कमी आहे. पाणीही कमी लागते. सध्या त्यांनी एक एकरांत ठिबक केले आहे. शेवगा पिकाला मजुरी खर्चही तुलनेने कमी येतो. पीक संरक्षण, रासायनिक व सेंद्रिय खते यांवरच जास्त खर्च करावा लागतो. मात्र, हे पीक वर्षभरातील हंगामाचा विचार करता दीड लाख रुपयांपर्यंत नफा देऊन जाते, असा अनुभव या शेतकऱ्याला आला आहे.