४-जी मोबाईल सेवेसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 10:44 PM2018-10-01T22:44:25+5:302018-10-01T22:44:50+5:30

दुर्गम भागात मोबाईल सेवा देणारी बीएसएनएल ही एकमेव केंद्र शासनाची कंपनी आहे. आॅनलाईन व्यवहारांना गती देण्यासाठी सध्या ४-जी सेवेची मागणी होत आहे. जिल्हाभरता ४-जी सेवा देण्यासाठी आपण केंद्र शासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन बीएसएनएलच्या जिल्हा सल्लागार समितीचे सहअध्यक्ष तथा खासदार अशोक नेते यांनी दिले.

Follow-up to center for 4G mobile service | ४-जी मोबाईल सेवेसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार

४-जी मोबाईल सेवेसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार

googlenewsNext
ठळक मुद्देखासदारांचे प्रतिपादन : बीएसएनएलच्या कामांचा घेतला आढावा, सेवा सुधारण्याबाबत निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दुर्गम भागात मोबाईल सेवा देणारी बीएसएनएल ही एकमेव केंद्र शासनाची कंपनी आहे. आॅनलाईन व्यवहारांना गती देण्यासाठी सध्या ४-जी सेवेची मागणी होत आहे. जिल्हाभरता ४-जी सेवा देण्यासाठी आपण केंद्र शासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन बीएसएनएलच्या जिल्हा सल्लागार समितीचे सहअध्यक्ष तथा खासदार अशोक नेते यांनी दिले.
जिल्हा सल्लागार समितीची आढावा बैठक बीएसएनएलच्या कार्यालयात सोमवारी पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार अशोक नेते होते. बैठकीला भाजपाचे शहर अध्यक्ष तथा सल्लागार समितीचे सदस्य सुधाकर येनगंधलवार, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष रेखा डोळस, न.प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, जि.प. सदस्य रंजिता कोडाप, विलास भांडेकर, बीएसएनएलचे महाप्रबंधक एम. ए. जीवने, वीज विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे, कार्यकारी अभियंता विजय मेश्राम, बीएसएनएलच्या आंतरिक विक्रीय सल्लागार सी. के. पंतगराव, सहायक महाप्रबंधक प्रमोद रामटेके, उपमहाप्रबंधक एच. आर. अधिकारी, उपमंडल अभियंता एल. डब्ल्यू. लोदी यांच्यासह बीएसएनएलचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आॅनलाईन व्यवहारांमुळे मोबाईल व इंटरनेटचे महत्त्व वाढत चालले आहे. त्यामुळे बीएसएनएलने जिल्हाभरात मोबाईल टॉवर उभारून कव्हरेज उपलब्ध करून द्यावे, त्यासाठी आवश्यक तेवढा निधी केंद्र शासनाकडून उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन खासदार नेते यांनी दिले. जिल्हाभरात कव्हरेजबाबतच्या अनेक तक्रारी आहेत. कव्हरेजची समस्या सोडविण्यासाठी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. नवीन टॉवरचे कामाला गती देणे आवश्यक आहे. ग्रामपंचायती आॅप्टिकल फायबरने जोडण्याचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू झाले आहे. मात्र या कामाला फारशी गती मिळत नसल्याबाबत खासदार अशोक नेते यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गडचिरोली जिल्हा जंगलाने व्यापला आहे. त्यामुळे कव्हरेज विस्तारावर मर्यादा येतात. हे जरी मान्य असले तरी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कव्हरेज जास्त दूर अंतरावर पोहोचेल यासाठी प्रयत्न करावे. जिल्ह्यात मोबाईल सेवा बळकट करण्यासाठी ज्या बाबींची आवश्यकता आहे, त्याचे प्रस्ताव आपल्याकडे सादर करा. तेवढा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन खासदार अशोक नेते यांनी दिले.
बीएसएनएलने फोडले वीज विभागावर खापर
वीज पुरवठा नेहमी खंडीत होत असल्याने मोबाईल टॉवर काम करीत नाही. काही ठिकाणी कमी दाबाचा वीज पुरवठा होतो. त्यामुळे बीएसएनएलची यंत्रे काम करीत नाही. त्याचबरोबर त्यामध्ये वेळोवेळी बिघाड निर्माण होते. दुर्गम भागातील टॉवर सुध्दा अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे. मात्र विजेची समस्या गंभीर असल्याने मोबाईल टॉवर पूर्ण शक्तीनिशी काम करीत नाही. त्यामुळे कव्हरेजची समस्या निर्माण होत आहे, ही बाब बीएसएनएलच्या अधिकाºयांनी खासदार अशोक नेते यांच्या लक्षात आणून दिली. खासदारांनी त्याचवेळी वीज विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे यांना फोन करून बैठकीत येण्याचे निर्देश दिले. त्यानुसार अधीक्षक अभियंता बोरसे व कार्यकारी अभियंता विजय मेश्राम यांनी बैठकीला उपस्थिती दर्शविली. विजेची समस्या सोडविण्याचे आश्वासन बोरसे यांनी दिले.

Web Title: Follow-up to center for 4G mobile service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.