कोरोनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईसाठी तयार राहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:49 AM2021-02-27T04:49:33+5:302021-02-27T04:49:33+5:30
राज्यातील इतर जिल्ह्याप्रमाणे आता गडचिरोली जिल्ह्यातही कोरोनाचे रूग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे वेळीच योग्य ती खबरदारी घेण्यासाठी विविध निर्बंधांची ...
राज्यातील इतर जिल्ह्याप्रमाणे आता गडचिरोली जिल्ह्यातही कोरोनाचे रूग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे वेळीच योग्य ती खबरदारी घेण्यासाठी विविध निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याचे आणि पालन न करणाऱ्यांना दंड आकारण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. या बैठकीला जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील आणि तालुक्यावरून व्हीसीद्वारे सर्व यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
नागरिक, व्यावसायिकांसाठी असे आहेत दंड
बैठकीत ठरल्याप्रमाणे नाकातोंडावर मास्क न वापरणाऱ्यांना ५०० रुपये दंड आकारला जाणार आहे. मंगल कार्यालये, मॉल तसेच सिनेमागृह या ठिकाणी कोरोनाबाबत काळजी न घेणाऱ्या मालकांना ५ हजार रुपये दंड, तसेच इतर दुकाने, हॉटेल, जिमखाना या ठिकाणी नियमांची अंमलबजावणी न केल्यास दुकान मालकांना २ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
विविध पथकांची राहणार नजर
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी पोलीस, तहसीलदार, नगरपालिका व नगरपंचायत मुख्याधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांच्या अधिनस्थ पथके तयार करण्यात आली आहेत. यामध्ये गडचिरोलीत ९, अहेरी, आरमोरी, वडसा व चामोर्शी या ठिकाणी प्रत्येकी ४, पथकांची निगराणी राहणार आहे. इतर तालुक्यात आवश्यकतेप्रमाणे २ ते ३ पथके काम पाहणार आहेत. या पथकातील सदस्य व पोलीस यांना कोरोनाबाबत दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी होत आहे की नाही, याच्या पाहणीसह दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
असे आहेत निर्बंध
- लग्न व इतर समारंभासाठी ५० लोकांची मर्यादा
- सर्व दुकानांमध्ये विनामास्क जाण्यास बंदी
- बसमध्येही विनामास्क प्रवासास बंदी
- इतर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांनाही मास्कची सक्ती
- धान खरेदी केंद्रांवरही योग्य दक्षता
आस्थापनांच्या संघटनांची बैठक
जिल्हाधिकारी कार्यालयात दुकान, हॉटेल, बाजार व इतर आस्थापनांच्या संघटनांची बैठक घेण्यात आली. यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत सूचना करण्यात आल्या. तसेच कोणत्याही परिस्थितीत विनामास्क ग्राहकांना दुकानात प्रवेश देवू नये, अन्यथा दंडात्मक कारवाई होईल असे बजावण्यात आले. यावेळी विविध संघटनांनी आपले विचार मांडले व कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी सहकार्य करू, असे आश्वासन दिले.
कोट-
जिल्हयात पुन्हा लॉकडाऊन लागू नये म्हणून आम्ही काही प्रमाणात कडक स्वरूपात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवित आहोत. गेल्या वर्षभरात लॉकडाऊनमुळे सर्वांचे अर्थिक नुकसान झाले. पुढेही असे होवू नये म्हणून आपण आत्ताच खबरदारी घेत आहोत. मास्क वापरून तसेच शारीरिक आंतर राखून आपला सार्वजनिक ठिकाणी वावर करुया. यामुळे कोणालाही दंड होणार नाही तसेच कोरोनालाही रोखण्यात यश येईल.
- कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी