ओबीसीच्या मागण्यांसाठी पाठपुरावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 10:25 PM2018-01-09T22:25:29+5:302018-01-09T22:25:54+5:30
ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू आहे. ओबीसी समाज आपला असून या समाजाचा आपल्यावर विश्वास आहे.
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू आहे. ओबीसी समाज आपला असून या समाजाचा आपल्यावर विश्वास आहे. ओबीसी समाजाच्या मागण्या तातडीने पूर्णत्वास नेण्यासाठी मुख्यमंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. ओबीसींच्या मागण्या लवकरच मान्य होतील. त्यामुळे ओबीसी नेते व कार्यकर्त्यांनी भाजपाची बाजू नेटाने उचलून धरावी असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष तथा खासदार अशोक नेते यांनी केले.
स्थानिक साईमंदिरात भाजपा ओबीसी मोर्चाची आढावा बैठक नुकतीच पार पडली. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, आमदार कृष्णा गजबे, अहेरी विधानसभा प्रमुख बाबुराव कोहळे, नगराध्यक्ष योगिता पिपरे, नगरसेवक प्रमोद पिपरे, रमेश भूरसे, सदानंद कुथे, प्रदीप चौधरी, चक्रधर कावळे, सुभाष घुटे आदी उपस्थित होते. पुढे मार्गदर्शन करताना खासदार अशोक नेते म्हणाले, भारतीय जनता पार्टीवर जनतेचा विश्वास आहे. हा विश्वास कायम ठेवण्यासाठी सर्वच कार्यकर्त्यांनी नागरिकांची सेवा करावी. ओबीसी समाजाच्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी येत्या काही दिवसात मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.