दूरदृष्टीने शोधला कमळ फुलाच्या विक्रीतून रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 10:19 PM2017-10-16T22:19:44+5:302017-10-16T22:20:08+5:30
सभोवताल अत्यंत कठीण अशी परिस्थिती असतानाही स्वत:च्या सर्वोत्तम गुणविशेषांनी स्वत:ला एकमेवाद्वितीय म्हणून सिद्ध करण्याची प्रेरणा कमळाचे फूल देते.
अतुल बुराडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
विसोरा : सभोवताल अत्यंत कठीण अशी परिस्थिती असतानाही स्वत:च्या सर्वोत्तम गुणविशेषांनी स्वत:ला एकमेवाद्वितीय म्हणून सिद्ध करण्याची प्रेरणा कमळाचे फूल देते. सौंदर्य आणि मांगल्याचे प्रतीक व राष्टÑीय फुलाचा दर्जा प्राप्त केलेले कमळाचे फूल लक्ष्मीदेवीलाही प्रिय आहे. त्यामुळे दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या दिनी कमळाचे फूल प्रत्येक नागरिक लक्ष्मीच्या चरणी अर्पण करतो. हीच बाब हेरून शंकरपूर येथील चंदनबटवे पितापुत्रांनी तलावांमधील कमळाची फुले गोळा करून ती नागपूरच्या बाजारपेठेत विक्री करून रोजगाराचे साधन उपलब्ध केले आहे. ही फुले नागपूर येथून राज्याबाहेरही पाठविली जात आहेत.
देसाईगंज-कुरखेडा मुख्य मार्गावर देसाईगंजपासून आठ किमी अंतरावर शंकरपूर गाव आहे. पुरूषोत्तम चंदनबटवे आणि त्यांचा परिवार येथीलच मूळ रहिवाशी आहेत. पाच-सहा वर्षांपूर्वी चंदनबटवे यांच्या नातलगांनी कमळाच्या फुलाला नागपूर बाजारपेठेत चांगला भाव मिळते, अशी माहिती दिली. या संधीचा फक्त विचारच न करता एक व्यापारी दृष्टिकोनातून कृती करण्याचा संकल्प चंदनबटवे परिवाराने सोडला. सुरुवातीला तालुक्याच्या कोरेगाव, डोंगरगाव, डोंगरमेंढा, नैनपूर तसेच आरमोरी, कुरखेडा तालुक्यातील व गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी तालुक्यात येणाºया तलावांची प्रत्यक्ष पाहणी केली. या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात कमळाची फुले आढळून आली. तलाव मालकांना फुलांच्या उपलब्धतेनुसार ठराविक रक्कम देऊन फुले काढली जातात. मजूर व स्वत: चंदनबटवे पितापूत्र कमळाची फुले काढतात. सदर फुले नागपूर येथे विक्रीसाठी नेली जातात. गणेश चतुर्थी, लक्ष्मीपूजन, धनत्रोयदशी या शुभदिनी कमळाच्या फुुलांना विशेष मागणी राहत असल्याने एक दिवसापूर्वी छाटनी करून फुले नागपूर येथे नेली जातात. तीन ते चार दिवस मुक्कामी राहून फुलांची विक्री केली जाते. यातून जवळपास २५ ते ३० हजार रूपयांचे उत्पन्न प्राप्त होते, अशी माहिती कैलास चंदनबटवे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील फूल अतिशय चांगल्या दर्जाचे राहत असल्याने या फुलांना चांगली मागणी व भाव मिळतो.
गुलाबी रंगाच्या फुलाला विशेष पसंती
नैनपूर, डोंगरगाव व आरमोरी तालुक्यातील विहिरगाव येथील तलावातून गुलाबी, पांढरे व लाल या तिन्ही रंगाची कमळाची फुले उपलब्ध होतात. यातील गुलाबी रंगाच्या फुलाला सर्वाधिक मागणी राहत असून सदर फूल १५ ते २० रूपयाला विकले जाते. त्यापाठोपाठ लाल व पांढºया फुलाचा क्रम लागतो. सदर फुले पाच ते दहा रूपये नग प्रमाणे विक्री केली जातात.
एकीकडे रोजगार नसल्याची ओरड सुरू असताना चंदनबटवे परिवाराने अतिशय दुर्लक्षित असलेल्या कमळाच्या फुलाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध केला आहे, हे इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.