गडचिरोली जिल्ह्यातील पोर्लात तयार होणार वनोपजावर आधारित पदार्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 02:15 PM2020-12-17T14:15:06+5:302020-12-17T14:17:01+5:30
Gadchiroli News जंगलाने व्यापलेल्या गडचिरोली जिल्ह्यात जंगलात नैसर्गिकरित्या मिळणाऱ्या बहुपयोगी वनस्पतींवर आधारित पदार्थांच्या निर्मितीसाठी ११३ लाखांच्या प्रकल्पाला खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने मंजुरी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जंगलाने व्यापलेल्या गडचिरोली जिल्ह्यात जंगलात नैसर्गिकरित्या मिळणाऱ्या बहुपयोगी वनस्पतींवर आधारित पदार्थांच्या निर्मितीसाठी ११३ लाखांच्या प्रकल्पाला खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने मंजुरी दिली आहे. आशा या संस्थेच्या पुढाकाराने उभारल्या जात असलेल्या या प्रकल्पातून विविध १५ पदार्थांची निर्मिती आणि विक्रीसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. यात २०० महिलांना थेट रोजगार निर्मिती होईल, अशी माहिती खादी-ग्रामोद्योग आयोगाचे विभागीय संचालक डॉ.सी.पी.कापसे आणि आशा संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रशांत भरणे यांनी येथे पत्रपरिषदेत दिली.
या पत्रपरिषदेला आशा संस्थेचे उपाध्यक्ष रविंद्र भांडेकर, सचिव एस.व्ही. वेलंकीवार आणि इतर पदाधिकारी तथा खादी-ग्रामोद्योग आयोगाचे अधिकारी उपस्थित होते.७० टक्के वनाने व्यापलेल्या गडचिरोली जिल्ह्यात वनावर आधारित उद्योगांशिवाय दुसरा पऱ्याय नाही. त्यामुळे जिल्ह्यातील जंगलात उपलब्ध असणाऱ्या हिरडा, बेहडा, मोह आदींचे संकलन करून त्यापासून विविध पदार्थांच्या निमिर्तीला आणि मार्केटिंगला प्राधान्य दिले जाणार आहे. संकलित होणाऱ्या वनौपजाला चांगला दरही दिला जाईल. त्यामुळे त्यामुळे कच्च्या मालाचा पुरवठा होईल, असे यावेळी सांगण्यात आले.
कच्च्या मालाच्या संकलनासाठी गोदाम उभारण्यासाठी वनविभागाने जागाही उपलब्ध करून दिली आहे. आयुर्वेदिक औषधी व पदार्थ निर्मितीच्या क्षेत्रात कार्यरत असणारे डॉ.भरणे महिलांना विविध वस्तूच्या निर्मितीसाठी मार्गदर्शन करतील. येत्या २१ डिसेंबरला आशा हर्बल क्लस्टरचे रितसर उद्घाटन पोर्ला येथे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या अध्यक्षतेखाली आणि खादी ग्रामोद्योग आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रीती वर्मा यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या पत्रपरिषदेला आशा संस्थेचे उपाध्यक्ष रविंद्र भांडेकर, सचिव एस.व्ही. वेलंकीवार आणि इतर पदाधिकारी तथा खादी-ग्रामोद्योग आयोगाचे अधिकारी उपस्थित होते.
२०० महिलांना प्रशिक्षण
जंगलात मिळणाऱ्या नैसर्गिक वनौपजावर प्रक्रिया करून कोणकोणते पदार्थ, कसे तयार करता येतात, त्यांचे पॅकेजिंग, मार्केटिंग आदींबाबतचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन २०० महिलांना दिले जात आहे. त्यातून किमान २० महिला उद्योजक म्हणून पुढे याव्यात, असा आमचा प्रयत्न असल्याचे डॉ.प्रशांत भरणे यांनी सांगितले. पोर्ला येथे त्यासाठी संयुक्त सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले आहे.