चितळाची शिकार... वन विभागाने आराेपींना घरून उचलले; कुनघाडा रै. वन परिक्षेत्रातील घटना
By गेापाल लाजुरकर | Published: March 31, 2024 08:46 PM2024-03-31T20:46:25+5:302024-03-31T20:50:10+5:30
कुनघाडा वनपरिक्षेत्रांतर्गत गिलगाव परिसरात चितळाची शिकार करून मांसाची वाटणी झाली व ते शिजवले असल्याची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाली
गडचिराेली : चामाेर्शी तालुक्याच्या कुनघाडा रै. वन परिक्षेत्रात चितळाची शिकार करून मांस शिजविणाऱ्या आराेपींबाबत माहिती मिळताच वन कर्मचाऱ्यांनी त्यांना शिजविलेल्या मांसासह घरून ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. ही कारवाई शनिवार ३० मार्च राेजी गिलगाव (जमीनदारी) येथे करण्यात आली.
कुनघाडा वनपरिक्षेत्रांतर्गत गिलगाव परिसरात चितळाची शिकार करून मांसाची वाटणी झाली व ते शिजवले असल्याची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार शनिवारी दुपारी १: १५ वाजताच्या सुमारास वन कर्मचाऱ्यांनी गिलगाव येथील संशयीत आरोपी पंकज शंकर पिंपळवार यांच्या घराची पाहणी केली असता त्याच्या घरून, वन्यप्राण्याचे कापून तुकडे केलेले मांस आढळून आले. त्यावरून त्यांची चौकशी करून मांस, ताब्यात घेऊन पंचासमक्ष जप्तीनामा व पंचनामा केला. या प्रकरणाचा पुढील तपास गडचिराेली वन विभागाचे सहायक वनसंरक्षक धीरज ढेंबरे, वन परिक्षेत्र अधिकारी एम. एम. तावाडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रसहायक एस. जी. झोडगे, वनरक्षक के. एम. मडावी हे करीत आहेत. या कारवाईसाठी अन्य वन कर्मचारी व वनाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.
चार आराेपींचा समावेश
आरोपी पंकज पिंपळवार याला कुनघाडा रै. वनपरिक्षेत्र कार्यालयात आणून चौकशी करून त्याचा कबुली जबाब नोंदविला. यावेळी त्याने अरूण विठ्ठल भोयर, रोहिदास शंकर मडावी दाेघेही रा. गिलगाव (जमिनदारी) व विलास काशिनाथ बोदलकर रा. बांधोना आदींचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे सांगितले. त्यानुसार सर्व आराेपींविरूध्द वनगुन्हा नोंदविण्यात आला. इतर सर्व कार्यवाही पूर्ण करून आराेपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले.