हल्लेखाेर वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पाठविला प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:38 AM2021-09-03T04:38:30+5:302021-09-03T04:38:30+5:30
गडचिराेली : तालुक्यात धुमाकूळ घालून नागरिकांच्या नरडीचा घाेट घेणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने कडक पावले उचलली आहेत. त्या हल्लेखोर ...
गडचिराेली : तालुक्यात धुमाकूळ घालून नागरिकांच्या नरडीचा घाेट घेणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने कडक पावले उचलली आहेत. त्या हल्लेखोर वाघाची ओळख पटली असल्याचा दावा करत त्याला जेरबंद करण्यासाठी परवानगी मिळावी असा प्रस्ताव वनसंरक्षक कार्यालयाने मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्याकडे पाठविला आहे.
गडचिराेली तालुक्यातील भिकारमाैशी, आंबेशिवणी, आंबेटाेला, मुरमाडी, अमिर्झा, माैशिखांब, टेंभा, चांभार्डा, धुंडेशिवणी, राजगाटा चक, उसेगाव, जेप्रा, दिभना, गाेगाव, अडपल्ली, महादवाडी, कुऱ्हाडी, चुरचुरा, नवरगाव, आदी गावांमध्ये वाघाने धुमाकूळ घातला आहे. मागील दहा महिन्यांत ११ शेतकऱ्यांचा त्यात बळी गेला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी त्या हल्लेखोर नरभक्षक वाघाचा बंदाेबस्त करावा, अशी मागणी रेटून धरली आहे. त्यासाठी वनसंरक्षक कार्यालयासमाेर ठिय्या आंदाेलनही केले जात आहे.
नागरिकांच्या आक्राेशाची दखल घेत वनविभागाने ड्राेन कॅमेरा तसेच ट्रॅप कॅमेऱ्याने नरभक्षक वाघाची ओळख पटविली आहे. या वाघाला जेरबंद करता यावे, यासाठी मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांच्याकडे प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावाला परवानगी मिळावी, यासाठी वनविभागामार्फत प्रयत्न केले जात आहेत. परवानगी मिळताच वाघाला जेरबंद केले जाणार आहे.
बाॅक्स...
दुसऱ्याही दिवशी आंदाेलन सुरूच
दरम्यान, वाघाला जेरबंद करावे यासाठी गडचिराेली तालुक्यातील गावांमधील नागरिक व भारतीय जनसंसदेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारपासून वनसंरक्षक कार्यालयासमाेर आंदाेलन सुरू केले. गुरुवारी दुसऱ्याही दिवशी आंदाेलन सुरूच हाेते. जाेपर्यंत वाघाला जेरबंद केले जात नाही, ताेपर्यंत आंदाेलन सुरूच ठेवण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. प्रत्येक गावचे नागरिक आळीपाळीने आंदाेलनात सहभागी हाेणार आहेत.
काेट ......
ट्रॅप कॅमेऱ्याच्या मदतीने त्या हल्लेखोर वाघाची ओळख पटली आहे. वाघाला जेरबंद करण्यासाठी मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. प्रस्तावाला मान्यता मिळावी यासाठी कार्यालयामार्फत पाठपुरावा सुरू आहे. मान्यता मिळताच वाघाला जेरबंद करण्यासाठी तत्काळ उपाययाेजना केली जाईल.
- डाॅ. किशाेर मानकर, वनसंरक्षक, गडचिराेली