आलापल्ली-एटापल्ली मार्गावरील जंगलाला आग
By admin | Published: March 14, 2016 01:21 AM2016-03-14T01:21:15+5:302016-03-14T01:21:15+5:30
एटापल्ली-आलापल्ली मार्गावरील जंगलात शनिवारपासून आग लागली असून सदर आग २४ तास सुरू राहिल्याने लाखो रूपयांची वनसंपत्ती जळून खाक झाली आहे.
वन विभागाचे दुर्लक्ष : लाखो रूपयांची वनसंपत्ती स्वाहा
एटापल्ली : एटापल्ली-आलापल्ली मार्गावरील जंगलात शनिवारपासून आग लागली असून सदर आग २४ तास सुरू राहिल्याने लाखो रूपयांची वनसंपत्ती जळून खाक झाली आहे. मात्र आग विझविण्यासाठी वन विभागाकडून कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाही.
एटापल्ली-आलापल्ली हा ३० किमीचा मार्ग असून या मार्गाच्या कडेला दोन्ही बाजूला मौल्यवान सागवानचे घनदाट जंगल आहे. या मार्गावर २४ तास वाहनांची वर्दळ सुरू असते. या मार्गावरून दररोज वन परिक्षेत्र एटापल्ली, गट्टा, कसनसूर, गेदा येथील वनाधिकारी व वनकर्मचारी ये-जा करीत असतात. त्यांच्या डोळ्यादेखत रात्रंदिवस जंगल आगीत जळत असले तरी एकाही वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी आग लागल्याची संबंधित हद्दीतील वनकर्मचाऱ्यांना माहिती दिली नाही. तसेच आग विझविण्याचा प्रयत्न केला नाही.
आलापल्लीपासून १० किमी अंतरावरील तोंदेल परिसरातील जंगलात आग सुरू असून सदर जंगल परिसर वन विकास महामंडळाच्या अखत्यारित येतो. वन विकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने आग विझविण्याचा प्रयत्न झाला नाही. मुख्य मार्गावरील जंगलातील आग विझविली जात नाही. तर दुर्गम भागातील जंगलातील आगीवर काय उपाययोजना होणार, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे. (तालुका प्रतिनिधी)