जंगलातील आगीमुळे अहेरी परिसराचे वातावरण प्रदूषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:37 AM2021-04-01T04:37:22+5:302021-04-01T04:37:22+5:30
अहेरी : परिसरातील अनेक ठिकाणच्या जंगलात आगी लागण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या वणव्यातून निघणाऱ्या धुरामुळे अहेरी परिसरातील वातावरण ...
अहेरी : परिसरातील अनेक ठिकाणच्या जंगलात आगी लागण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या वणव्यातून निघणाऱ्या धुरामुळे अहेरी परिसरातील वातावरण प्रदूषित झाले असून धुरामुळे दररोज धुकेसदृश परिस्थिती निर्माण होत आहे. यातून अनेकांना श्वसनाचा व डोळ्यांचा त्रास जाणवू लागला आहे.
अहेरी परिसरात घनदाट जंगल आहे. काही ठिकाणी कृत्रिमरीत्या आगी लावल्या जातात, तर काही ठिकाणी नैसर्गिकरीत्या आग लागते. आलापल्ली येथे वनविभागाचे मुख्यालय असून अनेक वनअधिकारी आणि वनरक्षकांचा फौजफाटा तिथे असतो. तरीही जंगलांना आगी लागण्याचे प्रमाण कमी होताना दिसत नाही.
एटापल्ली, भामरागड, सिरोंचा मार्गालगत असलेल्या जंगलात आगीचे रौद्र रूप बघावयास मिळत आहे, मात्र वनविभाग ही आग आटोक्यात ठेवण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत उदासीन दिसत आहे.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच हवा शुद्ध नसल्याने अनेकांना श्वसनाचा तथा डोळ्यांना जळजळ होऊन सतत पाणी निघण्याचा त्रास सुरू झाला आहे. जंगलात आग लागू नये यासाठी लाखो रुपये खर्च करून फायरलाइनसह विविध प्रयत्न वनविभागाकडून केले जातात. मात्र सहज विझवता येणाऱ्या काही ठिकाणच्या आगीकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. या आगीमुळे सरपटणारे छोटे जीव, साप, विंचू व विविध पक्षी मरत आहेत. काही मौल्यवान सागवानाचे वृक्ष आगीत भस्मसात होत आहेत. शिवाय परिसराच्या तापमानातही वाढ होत आहे.
(बॉक्स)
आगीमुळे दोन दुचाकी भस्मसात
धूलिवंदनाच्या दिवशी जंगलातील आगीमुळे आलापल्ली येथील दोन युवकांच्या भामरागड रस्त्यालगत ठेवलेल्या दोन दुचाकी अक्षरशः आगीच्या स्वाधीन झाल्या आणि पूर्णत: जळाल्या. एकीकडे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मागील काही दिवसांपूर्वी आलापल्ली येथे भेट देऊन वनअधिकारी व कर्मचाऱ्यांना जंगल संवर्धनाबाबत आदेश दिले होते, मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी तातडीने पावले उचलली नाहीत तर राज्यात प्रसिद्ध असलेले अहेरी उपविभागाचे जंगल नामशेष होण्याची शक्यता आहे.