वनपट्टेधारक शेतकरी धान विक्रीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:33 AM2021-01-18T04:33:27+5:302021-01-18T04:33:27+5:30
आरमोरी : शेतकऱ्यांच्या धानाला योग्य भाव मिळावा व खासगी व्यापाऱ्यांकडून त्याची पिळवणूक होऊ नये म्हणून शासनाने आधारभूत धान खरेदी ...
आरमोरी : शेतकऱ्यांच्या धानाला योग्य भाव मिळावा व खासगी व्यापाऱ्यांकडून त्याची पिळवणूक होऊ नये म्हणून शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करून हमीभावाने शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी सुरू केली आहे.मात्र, ज्या शेतकऱ्यांना शासनाने वनजमिनीचे पट्टे दिले त्या शेतकऱ्यांनी पिकविलेल्या धानाची हमीभावाने खरेदी करणे बंद असल्यामुळे पट्टेधारक शेतकरी धान विक्रीपासून वंचित राहिले आहेत.
केंद्र सरकारने ठरविलेल्या हमीभावानुसार मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत आधारभूत धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या धानाची हमीभावाने खरेदी करण्यात येत आहे. खरेदी केलेल्या धानावर क्विंटलमागे ७०० रुपये बोनस देण्याचा निर्णय मागील वर्षीपासून राज्य शासनाने घेतल्यामुळे शेतकरी व्यापाऱ्यांना धान विकण्याऐवजी खरेदी केंद्रात धानाची विक्री करीत आहे. मागील वर्षी वनजमिनीचे पट्टे मिळालेल्या शेतकऱ्याच्या धानाचीही आधारभूत किमतीने खरेदी करण्यात येत होती. मात्र, यावर्षी वनपट्टेधारक शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या धानाची आधारभूत किमतीने खरेदी करणे बंद असल्याने पट्टेधारक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून शासनाने त्यांच्या धानाची आधारभूत किमतीने खरेदी केली नाहीतर कमी किमतीने त्यांना खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करावी लागेल आणि त्यांना मोठे नुकसान सोसावे लागेल. बोनसचा लाभही त्यांना मिळणार नसल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. शासन प्रशासनाने दखल घेऊन पट्टेधारक शेतकऱ्यांच्या धानाची आधारभूत किमतीने खरेदी करावी अन्यथा शेतकरी आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत.