बनावट सुगंधित तंबाखूच्या कारखान्यावर धाड
By admin | Published: May 25, 2016 01:43 AM2016-05-25T01:43:15+5:302016-05-25T01:43:15+5:30
आरमोरी येथील बर्डी परिसरातील एका भाड्याच्या घरात अवैधरित्या विनापरवाना बनावट सुगंधीत तंबाखू तयार करणाऱ्या....
एक लाखाचा ऐवज जप्त : अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
आरमोरी : आरमोरी येथील बर्डी परिसरातील एका भाड्याच्या घरात अवैधरित्या विनापरवाना बनावट सुगंधीत तंबाखू तयार करणाऱ्या कारखान्यावर गडचिरोलीच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी धाड टाकून आरोपी आरीफ फत्ते मोहम्मद कासवानी याच्याकडून बनावट सुगंधीत तंबाखू, त्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य व सुपारी, असा एकूण एक लाख रूपयांचा ऐवज जप्त केला.
आरमोरीत बनावट सुगंधीत तंबाखू तयार करून त्याची बेकायदेशीर विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास अधिकाऱ्यांनी मे. आरीफ फत्ते मोहम्मद कासवानी यांच्या आरमोरी येथील विनापरवाना सुरू असलेल्या बनावट सुगंधीत तंबाखू तयार करण्याच्या कारखान्यावर धाड टाकली. दरम्यान आरीफ फत्ते मोहम्मद कासवानी हे एका भाड्याच्या खोलीत बनावट सुगंधीत तंबाखू तयार करून त्यांची पॅकींग करीत असल्याचे दिसून आले.
सदर कारवाई अन्न व औषध प्रशासन विभाग गडचिरोलीचे सहायक आयुक्त एम. एच. केंबळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी जी. टी. सातकर यांनी केली. सदर बनावट कारखान्याची गोपनिय माहिती अन्न व औषध प्रशासन नागपूर येथील दक्षता विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी ललीत सोयाम, प्रविन उमप यांनी गोळा केली. आरोपी कासवानी यांच्या विरोधात आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. (वार्ताहर)