आरमोरीत वाहतूक पोलीस चौकीची निर्मिती
By admin | Published: January 3, 2017 12:53 AM2017-01-03T00:53:29+5:302017-01-03T00:53:29+5:30
आरमोरी येथील मुख्य मार्गावरील जुन्या बसस्थानक परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या ..
सागर कवडे यांच्या हस्ते उद्घाटन : प्रभारी पोलीस निरीक्षकांचा पुढाकार
आरमोरी : आरमोरी येथील मुख्य मार्गावरील जुन्या बसस्थानक परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या वाहतूक पोलीस चौकीचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला आरमोरीचे प्रभारी पोलीस निरिक्षक तथा परीविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील, सहायक पोलीस निरिक्षक पी. पी. साखरे, पोलीस उपनिरिक्षक शितल राणे, होमगार्ड तालुका समादेशक अनिल सोमनकर आदी उपस्थित होते.
आरमोरी हे जिल्ह्याच्या वाहतुकीचे केंद्र आहे. गडचिरोलीवरून आरमोरी मार्गे नागपूर, भंडारा, देसाईगंज, गोंदियाकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. आरमोरीच्या मुख्य मार्गावरील परिसरात वाहनांची नेहमीच वर्दळ असते. या मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून दोन वाहतूक पोलीस व त्यांच्या मदतीला दोन होमगार्डची नियुक्ती करण्यात आली. मात्र वाहतूक पोलीस चौकी नसल्यामुळे वाहतूक पोलिसांना कर्तव्य पार पाडताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबीची दखल घेऊन परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी तथा प्रभारी ठाणेदार डॉ. रणजीत पाटील यांनी वाहतूक पोलीस चौकीच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला. त्यानंतर जुन्या बसस्थानकालगतच वाहतूक पोलीस चौकी निर्माण करण्यात आली. कार्यक्रमाला वाहतूक पोलीस शिपाई बंडू कोसरे, छाया ठाकरे, मोरेश्वर मेश्राम, अनिल ठाकरे, उंदीरवाडे, शेंडे, कोल्हटकर हजर होते. (वार्ताहर)
अवैध वाहतुकीला आळा बसणार
आरमोरी येथील जुन्या परिसरात नव्याने पोलीस चौकीची निर्मिती करण्यात आली. आता या ठिकाणी वाहतूक पोलीस व होमगार्ड दिवसभर तैनात राहणार आहेत. त्यामुळे अवैधरित्या, विनापरवाना होणाऱ्या वाहतुकीवर आळा बसणार आहे. अपघातावर नियंत्रण येणार आहे.