माजी जि.प. अध्यक्ष कुत्तरमारे व दोन अभियंत्यांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 05:00 AM2020-06-15T05:00:00+5:302020-06-15T05:00:56+5:30
भामरागड तालुक्यातील मडवेली ते सिपनपल्ली तसेच हिंदेवाडा ते पिटेकसा या रस्त्यांची कामे जिल्हा परिषद मार्फत मंजूर करण्यात आली होती. सदर कामांचे कंत्राट माजी जि.प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांना मिळाले होते. मात्र कामे पूर्ण न करताच अधिकच्या बिलाची उचल झाल्याची तक्रार जिल्हा परिषदेला प्राप्त झाली. त्यानुसार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी चौकशी करण्याचे निर्देश दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कामापेक्षा अधिकचे बिल उचलण्याच्या प्रकरणात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा कंत्राटदार प्रशांत कुत्तरमारे, एटापल्लीचे प्रभारी उपविभागीय अभियंता डब्ल्यू. पी. बोदलवार आणि भामरागडचे कनिष्ठ अभियंता प्रकाश शंखदरबार यांच्या विरोधात भामरागड पोलीस स्टेशनमध्ये रविवारी गुन्हे दाखल करण्यात आले.
जिल्हाभरात गाजत असलेल्या या प्रकरणाची तक्रार जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाल्यानंतर सर्वप्रथम लोकमतने यावरील वृत्त प्रकाशित करून लक्ष वेधले होते.
भामरागड तालुक्यातील मडवेली ते सिपनपल्ली तसेच हिंदेवाडा ते पिटेकसा या रस्त्यांची कामे जिल्हा परिषद मार्फत मंजूर करण्यात आली होती. सदर कामांचे कंत्राट माजी जि.प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांना मिळाले होते. मात्र कामे पूर्ण न करताच अधिकच्या बिलाची उचल झाल्याची तक्रार जिल्हा परिषदेला प्राप्त झाली. त्यानुसार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी चौकशी करण्याचे निर्देश दिले. चौकशी समितीने प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता, मडवल्ली ते सिपनपल्ली या पांदन रस्त्याचे काम अपूर्ण आढळले. या कामासाठी एकूण २९ लाख ४९ हजार ८०८ रुपयांचे बिल मंजूर करण्यात आले होते. इतर कपात वगळता कंत्राटदाराला २१ लाख ४४ हजार ९६४ रुपयांचे बिल मार्च २०२० मध्ये देण्यात आले. हिंदेवाडा ते पिटेकसा हा रस्ता ८०० मीटर लांबीचा असून त्याचेही काम न करता बिलाची उचल झाली असल्याचे दिसून आले आहे.
चौकशी अहवालानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या निदेर्शानुसार जिल्हा परिषदेचे प्रभारी कार्यकारी अभियंता ललित होळकर यांनी मडवेली-सिपनपल्ली या रस्त्याच्या कामात झालेल्या गैरव्यवहाराबाबतची तक्रार रविवारी भामरागड पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. त्यानुसार कंत्राटदार प्रशांत कुत्तरमारे, उपविभागीय अभियंता वामन बोदलवार व कनिष्ठ अभियंता प्रकाश शंखदरबार यांच्या विरोधात भादंवि ४२०, ४०९, ३४, ४६५, ४६७, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास ताडगाव पोलीस मदत केंद्राकडे सोपविला आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही अभियंत्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी १२ जून रोजी निलंबित केले आहे.