किल्ल्याच्या बुरूजाला पडल्या भेगा
By admin | Published: July 22, 2016 01:29 AM2016-07-22T01:29:12+5:302016-07-22T01:29:12+5:30
‘भिंत खचली, उलथून खांब गेला’ या काव्य ओळीप्रमाणे वैरागड येथील ऐतिहासिक किल्ल्याची अवस्था सध्यास्थितीत झालेली आहे.
पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष : सौंदर्यीकरणासाठी लाखोंचा खर्च तरीही भग्नावस्था
वैरागड : ‘भिंत खचली, उलथून खांब गेला’ या काव्य ओळीप्रमाणे वैरागड येथील ऐतिहासिक किल्ल्याची अवस्था सध्यास्थितीत झालेली आहे. किल्ल्याच्या बुरूजाला भेगा पडल्या असून किल्ल्याच्या भिंतींना झाडाझुडुपांनी वेढा दिल्याने किल्ला भग्नावस्थेत आहे. किल्ल्याच्या सौंदर्यीकरणासाठी लाखोंचा निधी मंजूर होतो. थोडीफार दुरूस्ती होते. परंतु पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे किल्ल्याची दुरवस्था झाली आहे.
२००१ मध्ये युती सरकारच्या काळात वैरागडला ‘क’ दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. परंतु किल्ल्याच्या दुरूस्तीसाठी अपेक्षित निधी मंजूर झाला नाही. मागील तीन - चार वर्षांपासून किल्ल्याच्या दुरूस्तीसाठी लाखो रूपयांचा निधी मंजूर होत असला तरी किल्ल्याच्या सौंदर्यीकरणात कोणतीही भर पडली नाही. दोन वर्षांपासून किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील तटाची दुरूस्ती केली जाते. व पावसाळा सुरू झाला की, सौंदर्यीकरणाचे काम बंद होते. मागील दोन वर्षांत दुरूस्तीसाठी तीन कंत्राटदारांना काम देण्यात आले. लाखो रूपयांचा निधी मंजूर होऊन सदर काम कासवगतीने करण्यात आले. काम मंद गतीने होण्यामागे निधी अपुरा पडत असल्याचे कारण या कंत्राटदारांकडून सांगितल्या जाते. विदर्भात जेवढ्या ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यामध्ये वैरागड येथील भंडारेश्वर मंदिर, गोरजाई मंदिर, किल्ला आदी महत्त्वाचे ठिकाण आहेत. पूर्वी वैरागड येथे हिऱ्याची खाण होती. तिच्या रक्षणासाठी चंद्रपूरचा गोंड राजा बल्हाळशहाने वैरागडचा किल्ला बाराव्या शतकात बांधला. परंतु शासनाकडून या ऐतिहासिक वास्तूची योग्य निगा राखली जात नसल्याने काही वर्षात सदर वास्तू मातीमोल होण्याची शक्यता येथील नागरिक व्यक्त करीत आहेत. पुरातत्त्व विभागाच्या वतीने सौंदर्यीकरणाचे काम हाती घेतले जाते. परंतु पावसाळा सुरू होताच सदर काम बंद केले जाते. त्यामुळे किल्ल्याच्या भिंतीला झाडाझुडुपांचा वेढा असतो. सध्या येथील बुरूजही भग्नावस्थेत जात असल्याने ते खचून दगड अस्ताव्यस्त पसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (वार्ताहर)
वैरागड येथील ऐतिहासिक किल्ल्याच्या सभोवताल खंदक आहे. या खंदकानंतर किल्ल्याची मोठी भिंत आहे. परंतु या भिंतीला झाडाझुडुपांनी वेढा दिल्याने सर्वत्र जंगलाचे रूप किल्ल्याला प्राप्त झाले आहे. सौंदर्यीकरणासाठी झुडुपांची तोड करण्यात आली होती.