वर्षभरात आढळले १७८४ क्षयरूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 01:10 AM2019-03-24T01:10:06+5:302019-03-24T01:10:37+5:30
जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालय व आरोग्य विभागाच्या वतीने १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत क्षयरूग्ण शोधमोहीम राबविण्यात आली. वर्षभरात गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ हजार ७८४ क्षयरूग्ण शोधून काढण्यात आले. या रूग्णांवर आरोग्य विभागाच्या वतीने औषधोपचार करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालय व आरोग्य विभागाच्या वतीने १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत क्षयरूग्ण शोधमोहीम राबविण्यात आली. वर्षभरात गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ हजार ७८४ क्षयरूग्ण शोधून काढण्यात आले. या रूग्णांवर आरोग्य विभागाच्या वतीने औषधोपचार करण्यात आला. गडचिरोली जिल्हा क्षयरोग मुक्त करण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाने केला आहे.
२४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. राबर्ट कोच या शास्त्रज्ञाने २४ मार्च १८८२ मध्ये मायकोबॅक्टेरीअम ट्युबरक्युलोसीस या जिवाणूचा शोध लावला म्हणून २४ मार्च हा दिवस आपण जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा करतो. सन १९०५ मध्ये राबर्ट कोच यांना औषधशास्त्रामधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल नोबेल पारितोषीक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम गडचिरोली जिल्ह्यामध्ये १६ आॅक्टोबर २००२ पासून सुरू आहे. या कार्यक्रमाअंतर्गत एका वर्षाकाठी जवळपास १७०० क्षयरूगण औषधोपचार घेतात.
क्षयरोगाचे निदान झाल्यानंतर उपचारासाठी येणाऱ्या रूगणास दरमहा ५०० रुपये डीबीटी स्वरूपात निक्षय पोषण योजनांद्वारे औषधोपचार पूर्ण होईपर्यंत दिले जातात. जेणेकरून रूग्णांनी चांगला पौष्टिक आहार घ्यावा, असा उद्देश आहे. सन २०१८ मध्ये जानेवारी ते डिसेंबर या १२ महिन्याच्या कालावधीत जिल्हाभरात एकूण १ हजार ७८४ क्षयरूग्ण शोधून काढण्यात आले. त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आला. वर्षभरातील या कामगिरीसाठी गडचिरोली जिल्ह्याचा संपूर्ण राज्यामध्ये प्रथम क्रमांक आला. क्षयरोग निदानासाठी गडचिरोली जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या अद्यावत उपचार पध्दतीचा लाभ घेऊन जिल्हा क्षयरोगमुक्त करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
अशी आहे डॉट्स उपचार पद्धती
डॉट्स उपचार पध्दतीमध्ये क्षयरूग्णावर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समक्ष प्रत्यक्ष देखरेखीखाली प्रमाणित औषधे मोफत पुरविली जातात. तसेच क्षयरोगावर उपलब्ध असलेल्या एक दिवसाआड औषधोपचार पध्दतीमध्ये बदल करण्यात आला आहे. आता दररोज औषधोपचार पध्दती व नियमित डॉट्स ९९ पध्दतीमध्ये क्षयरूग्णांना औषधोपचार पुरविला जातो. तसेच क्षयरोगाच्या निदानासाठी जिल्हा क्षयरोग केंद्रात एलईडी सुक्ष्मदर्शी अत्याधुनिक यंत्र व सीबीनॅट यंत्र उपलब्ध झाले आहे. सीबीनॅट यंत्राद्वारे अवघ्या दोन ते तीन तासात क्षयरोगाचे निदान करणे शक्य झाले आहे.
ही आहेत क्षयरोगाची लक्षणे
दोन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त दिवस असणारा खोकला, संध्याकाळी हलकासा ताप येणे, व्यक्तीच्या वजनात घट होणे, भूक मंदावणे, छातीत दुखणे, थुंकीत रक्त पडणे आदी क्षयरोगाची लक्षणे आहेत. सदर लक्षणे दिसून आल्यास संबंधित व्यक्तीला क्षयरोगाचा संशयीत रूग्ण समजण्यात यावा, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
क्षयरोगमुक्त जिल्ह्यासाठी सहकार्य करा -जिल्हाधिकारी शेखर सिंह
भविष्यात गडचिरोली जिल्हा क्षयरोग मुक्त होण्यासाठी डॉट्स उपचार पध्दतीचा अवलंब करून प्रशासनास सहकार्य करावे. क्षयरोगाची लक्षण आढल्यास संबंधिताने तत्काळ आरोग्य संस्थेत जाऊन तपासणी करावी, शासकीय रूग्णालयातून नियमित औषधोपचार घ्यावा, असे आवाहन गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले
आहे.सोमवारी विशेष कार्यक्रम
जिल्हा क्षयरोग नियंत्रण समितीच्या वतीने गडचिरोली येथे सामान्य रूग्णालयात २५ मार्च रोजी सोमवारला जागतिक क्षयरोग दिनाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमात क्षयरोग मुक्तीवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. शिवाय क्षयरोग मुक्तीसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचा गौरव होणार आहे. यात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे तसेच जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सचिन हेमके यांनी केले आहे.