साडेचार वर्षांत आमदारांचे मताधिक्य २0,३८४ ने घटले
By admin | Published: May 27, 2014 11:40 PM2014-05-27T23:40:56+5:302014-05-27T23:40:56+5:30
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने नवा चेहरा म्हणून गडचिरोलीचे उच्चविद्या विभुषीत आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांना उमेदवारी दिली होती.
गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने नवा चेहरा म्हणून गडचिरोलीचे उच्चविद्या विभुषीत आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांना उमेदवारी दिली होती. ते लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले. परंतु अवघ्या साडेचार वर्षात त्यांचे मताधिक्यही २0 हजार ३८४ मतांची घटल्याचे समोर आले आहे. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते विधानसभेच्या विजयाबाबत साशंक आहेत. पुन्हा निवडणूक डॉ. उसेंडी यांनी लढवू नये, असे म्हणणारेही अनेक कार्यकर्ते असले तरी परिस्थिती सुधारेल, असे सांगणारेही शेकडो नेते आहेत. त्यामुळे काँग्रेस सध्या द्विधा मनस्थितीत आहे. २00९ मध्ये विधानसभेची निवडणूक सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये पार पडली. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून डॉ. नामदेवराव उसेंडी हे गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून रिंगणात होते. त्यांनी या निवडणुकीत ६७ हजार ५४२ मते मिळवून भाजपचे उमेदवार अशोक नेते यांचा ९६0 मतांची पराभव केला होता. नेते यांना ६६ हजार ५८२ मते मिळाली होती. साडेचार वर्षात महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार असल्याने डॉ. उसेंडी यांच्या माध्यमातून अनेक कामे जिल्ह्यात झाली. सुदैवाने पालकमंत्री म्हणून आर. आर. पाटील यांच्यासारखा वजनदार मंत्री जिल्ह्याला मिळाला. मोठे सिंचन प्रकल्पही मार्गी लावल्याचा दावा काँग्रेस पक्षाने केला. राहूल गांधींच्या मर्जीतील आमदार म्हणून डॉ. उसेंडी यांचा लौकीक सर्वदूर पसरला. या माध्यमातूनच मधुसूदन मिस्त्री यांनी वर्षभरापूर्वीच डॉ. उसेंडी यांच्या कामावर शिक्कामोर्तब करीत त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्याचे निश्चित केले होते, असा दावाही काँग्रेसचे काही अतिउत्साही पदाधिकारी निवडणुकी दरम्यान करीत होते. साडेचार वर्षात उसेंडी यांचे मताधिक्य मतदारांनी मात्र २0 हजार ३८४ ने खाली घसरविलेले आहे. शेअरबाजाराचा निर्देशांक ज्या प्रमाणे गडगडतो त्याच धर्तीवर उसेंडी यांचे मताधिक्यही २0१४ मध्ये २0 हजारावर खाली आले आहे. लोकसभा निवडणुकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रात डॉ. उसेंडी यांना ४६ हजार १५८ मते मिळाली आहे. त्यामुळे डॉ. उसेंडी यांच्या लोकप्रियतेला कमालीची ओहटी लागली, असे स्पष्टपणे दिसून येत आहे. ग्रामीणस्तरावरील काँग्रेस कार्यकर्त्यांचा त्यांच्याशी संपर्क कमी होत असल्याचे हे लक्षण आहे. त्यामुळे आगामी विधानसभेची निवडणूक त्यांच्यासाठी अतिशय कठीण टप्प्यातील आहे. त्यामुळे उसेंडीविरोधक त्यांची उमेदवारी कापून नवा उमेदवार मागण्यासाठी कंबर कसणार आहे. एकूणच काँग्रेस पक्षo्रेष्ठीही याबाबत काय चिंतन करते, याकडे काँग्रेसच्या अनेक जुन्या नेत्यांचे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)