अस्वल शिकारप्रकरणी चार जणांना अटक; आरोपींकडून २० नखे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2022 11:22 AM2022-11-01T11:22:35+5:302022-11-01T11:24:49+5:30
२७ ऑक्टोबर रोजी सिरोंचा वनपरिक्षेत्रातील आरडा नियत क्षेत्रात अस्वल मृतावस्थेत आढळून आले होते.
सिरोंचा (गडचिरोली) : जीवंत विद्युत तारेच्या सहाय्याने अस्वलाची शिकार करून अवयव गायब केल्याप्रकरणी आरोपींच्या शोधात असलेल्या सिरोंचा वनविभागाच्या पथकाला अखेर आरोपींचा शोध घेण्यात यश आले. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच सदर आरोपींकडून अस्वलाची २० नखे जप्त करण्यात आली आहेत. मधुकर मलय्या दुर्गम (रा. पेंटीपाका), महेंद्र चंद्रय्या कुम्मरी, राजबापू पेदासमय्या दुर्ग व समय्या मलय्या दुर्गम (सर्व रा. लक्ष्मीपूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
२७ ऑक्टोबर रोजी सिरोंचा वनपरिक्षेत्रातील आरडा नियत क्षेत्रात अस्वल मृतावस्थेत आढळून आले होते. घटनास्थळावरील एकंदरीत स्थितीवरून अस्वलाची शिकार केल्याचे स्पष्ट होत होते. याप्रकरणातील संशयित आरोपींच्या शोधार्थ सिरोंचा वनपरिक्षेत्राधिकारी पी. एम. पाझारे यांच्या मार्गदर्शनात पथक रवाना झाले होते. दरम्यान, या प्रकरणातील चार आरोपींना पकडण्यात वनविभागाला यश आले आहे.
आरोपींनी अस्वलाच्या चारही पायाचे पंजे तसेच गुप्तांग कापून नेले. दरम्यान, घटनास्थळालगतच्या जंगल परिसरातील मोहाच्या झाडालगत आरोपींनी अस्वलाची नखे पिशवीत लपवून ठेवल्याची कबुली दिली.
अन् अस्वल फसले तारांच्या जाळ्यात
संबंधित आरोपींनी रानटी डुकराची शिकार करण्यासाठी पेंटीपाका-पाटीपोचम्मा जंगल परिसरातील मार्गालगत जीवंत विद्युत तारा सोडल्या होत्या. मात्र, सदर जाळ्यात रानटी डुकरांऐवजी १० वर्षीय अस्वल फसले गेले. विद्युत करंट लागल्याने अस्वलाचा जागीच मृत्यू झाला. माहितीच्या आधारे वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता २० नखे तसेच शिकारीसाठी वापरात आणलेले २ बंडल वायर, तांब्याच्या तारा जप्त करण्यात आल्या. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी पाझारे यांच्या मार्गदर्शनात वनपाल एस. एस. निलम, ए. बी. पोटे, आर. वाय. तलांडी, वनरक्षक आर. एल. आत्राम, एस. बी. भिमटे करीत आहेत.