मुरूमगावातील दारू तस्कराला चार दिवसांचा पीसीआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:04 AM2019-08-29T00:04:48+5:302019-08-29T00:08:29+5:30

आरोपी बहेरवार याच्यावर गडचिरोली ठाण्यात २, मुरूमगाव ठाण्यात २ आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडलेल्या दारूसंदर्भात १ असे पाच गुन्हे दाखल आहेत. याशिवाय छत्तीसगड राज्यातील पेंढरी पोलीस ठाण्यातही दारूची आयात प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याचे कळते.

Four-day PCR for alcohol smuggling in Murumgaon | मुरूमगावातील दारू तस्कराला चार दिवसांचा पीसीआर

मुरूमगावातील दारू तस्कराला चार दिवसांचा पीसीआर

Next
ठळक मुद्देदीड महिन्यानंतर शरण : सहकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न?

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथे दीड महिन्यांपूर्वी शेतात मोठ्या प्रमाणात दारूसाठा गोळा करून ठेवणाऱ्या आणि दारूमुक्त गाव समितीच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या अंगावर वाहन चालविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी व्यंकटेश बहेरवार याला अखेर अटक झाली. त्याला ४ दिवसांचा पीआरही मिळाला. पण या प्रकरणात त्याला साथ देणारे इतर आरोपी अद्यापही मोकाट असून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरू आहे.
आरोपी बहेरवार याच्यावर गडचिरोली ठाण्यात २, मुरूमगाव ठाण्यात २ आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडलेल्या दारूसंदर्भात १ असे पाच गुन्हे दाखल आहेत. याशिवाय छत्तीसगड राज्यातील पेंढरी पोलीस ठाण्यातही दारूची आयात प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याचे कळते. असे असताना गेल्या दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून तो पोलिसांना हुलकावण्या देत होता. अखेर दोन दिवसांपूर्वी तो स्वत:च पोलिसांना शरण गेला. मात्र गेल्या दिड महिन्यात आपल्यावरील दारू आणि जीवे मारण्याचा प्रयत्न या गुन्ह्यांमधून बाहेर पडण्यासाठी योग्य ती व्यवस्था त्याने लावून ठेवल्याची चर्चा आहे.
छत्तीसगडमधील हलकी दारू आणणे आणि ती विशिष्ट ठिकाणी साठवून त्यातून इतर नामांकिन कंपन्यांची बनावट दारू बनविणे हा गोरखधंदा धानोरा तालुक्यातूनच सुरू असतो. विशेष म्हणजे या कामात बहेरवार याचे काही विश्वासू सहकारी आणि एक जवळचा नातेवाईक आहे. मुरूमगाव येथील महिलांनी दारू पकडली त्यावेळी हे लोकही तिथे होते. पण अद्याप त्यांचे नाव या प्रकरणात गोवण्यात आलेले नाही हे विशेष. बहेरवार याच्या अनुपस्थितीत हेच लोक त्याचा संपूर्ण कारभार पाहतात. त्यामुळे कारभार सुरळीत चालू ठेवण्यासाठी त्यांना बाहेर ठेवण्याची पुरेपूर व्यवस्था केली जात आहे.
पोलीस ठोस भूमिका घेणार का?
यासंदर्भात हे प्रकरण हाताळत असलेले मुरूमगावचे पोलीस निरीक्षक राजू थोरात यांना विचारणा केली असता आरोपी बहेरवार याच्या त्या सहकारी आणि नातेवाईकांबद्दलची माहीती असली तरी बहेरवार त्यांची नावे घेणार नसेल तर ते या प्रकरणात गुंतले आहेत असे म्हणता येणार नसल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे धानोराचे एसडीपीओ विक्रांत गायकवाड यांना विचारले असता ‘त्या’ आरोपींची पोलिसांना कल्पना असून आरोपीने त्यांना मोकळे ठेवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही त्यांच्यावर कारवाई करू, असा विश्वास व्यक्त केला. या प्रकरणावर माझे पूर्ण लक्ष असून कोणालाही वाचविण्याचा प्रयत्न होणार नाही, असे ते म्हणाले.
‘त्या’ वाहनांचे मालकही मोकळेच
मुरूमगावच्या प्रकरणात ज्यांच्या वाहनातून दारूची आयात होत होती त्या वाहनांच्या मालकांवरही अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. ती वाहने आरोपी बहेरवार याने भाड्याने घेतली होती, त्यामुळे वाहन मालकांचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे सांगत त्यांना अभय दिले जात आहे. त्यामुळे एकूणच या प्रकरणाच्या खोलाशी न जाता सारवासारव करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Four-day PCR for alcohol smuggling in Murumgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.