गुरूनोली येथे बिबट्याच्या हल्ल्यात चार शेळ्या ठार
By admin | Published: August 3, 2015 01:03 AM2015-08-03T01:03:15+5:302015-08-03T01:03:15+5:30
कुरखेडा तालुका मुख्यालयापासून नऊ किमी अंतरावर असलेल्या गुरनोली येथील धनाजी नंदेश्वर यांच्या मालकीच्या गोठ्यात असलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला चढवून ..
गुरनोली : कुरखेडा तालुका मुख्यालयापासून नऊ किमी अंतरावर असलेल्या गुरनोली येथील धनाजी नंदेश्वर यांच्या मालकीच्या गोठ्यात असलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला चढवून चार शेळ्यांना ठार केल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. १५ दिवसांतील गुरनोली येथील ही दुसरी घटना आहे.
धनाजी नंदेश्वर यांनी बचत गटाच्या माध्यमातून शेळी पालन व्यवसाय सुरू केला. नेहमीप्रमाणे सायंकाळी शेळ्या परतल्यानंतर नंदेश्वर यांनी त्यांना गोठ्यात बांधले. दरम्यान रात्री बिबट्याने हल्ला चढवून तीन शेळ्या जागीच ठार केल्या. तर एक शेळी जंगलात घेऊन बिबट्या पसार झाला. या घटनेमुळे धनाजी नंदेश्वर यांचे २५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. सदर घटनेचा पंचनामा गेवर्धाचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला. शासनाकडून नंदेश्वर यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. १५ दिवसांपूर्वी गुरनोली येथे दिलीप खुणे यांच्या मालकीच्या बोकडावर बिबट्याने हल्ला चढवून ठार केले होते. (वार्ताहर)