भामरागड मार्गावरील चार ठेंगणे पूल अडवितात वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:42 AM2021-09-15T04:42:25+5:302021-09-15T04:42:25+5:30
भामरागड : भामरागड-आलापल्ली मार्गावर चार ठिकाणी ठेंगणे पूल आहेत. पावसाळ्यात सदर रपट्यांवरून पुराचे पाणी वाहत असते. त्यामुळे अनेकदा हा ...
भामरागड : भामरागड-आलापल्ली मार्गावर चार ठिकाणी ठेंगणे पूल आहेत. पावसाळ्यात सदर रपट्यांवरून पुराचे पाणी वाहत असते. त्यामुळे अनेकदा हा मार्ग रहदारीसाठी बंद असताे. मार्गावरील रपट्यांच्या जागी उंच पुलाचे बांधकाम करण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे. परंतु, या मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याने नागरिकांमध्ये राेष आहे.
दुर्गम भागातील नागरिकांना जिल्हा मुख्यालयात येण्यासाठी भामरागड-आलापल्ली हा एकमेव मार्ग आहे. या मार्गावर चंद्र नाला, ताडगाव नाला, तसेच कुडकेली व कुमरगुडा गावाजवळ नाला आहे. या नाल्यांवर ठेंगणे पूल व रपटे आहेत. पावसाळ्यात पुलांवरून पुराचे पाणी वाहत असते. दरवर्षी पावसाळ्यात वाहतूक ठप्प होते. मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी उंच पूल बांधण्याची मागणी हाेत आहे; मात्र याकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने याही वर्षी पावसाळ्यात प्रवाशांचे हाल होणार आहेत.
भामरागड-आलापल्ली मार्गावर जागाेजागी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. आलापल्लीपर्यंतचे ६५ कि.मी. अंतर गाठण्यासाठी अडीच ते तीन तास प्रवास करावा लागताे. परंतु, सध्या रस्ता बांधकाम सुरू असल्याने ही समस्या सुटणार आहे. तसेच पेरमिली गावाजवळचा मोठा नाला व बांडिया नदीसह पर्लकोटा या मोठ्या नदीवरही उंच पूल बांधण्याचे काम सुरू आहे. दरवर्षी चार-पाच दिवस भामरागड तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटताे. परंतु, या पुलांचे बांधकाम झाल्यास संपर्क तुटणार नाही. बारमाही वाहतूक सुरू राहील. चंद्रनाला, कुडकेली नाला, ताडगाव व कुमरगुडा नाल्यांवर उंच पूल बांधकाम करण्याबाबत काहीच हालचाली दिसून येत नाही. पावसाळ्यात चंद्रनाला पार केला तरी कुडकेली नाला अडवितो. त्यानंतर पेरमिलीपर्यंतही परत जाता येत नाही. तसेच एक वेळ चंद्रनाला व कुडकेली नाला पार केला तर कधी ताडगाव नाला अडवितो किंवा ताडगाव नाला पार केला तर कुमरगुडा नाला वाट अडविताे. पावसाळ्यात थाेडाही पाऊस आल्यास ठेंगणे पूल व रपट्यांवरून पाणी वाहते. पावसाळ्यात ही स्थिती अनेकदा निर्माण हाेते. पायदळ, सायकल व मोटारसायकलस्वार जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. खासगी वाहनधारक व रात्री मुक्कामाच्या बसेस पूर ओसरेपर्यंत प्रतीक्षा करतात. त्यामुळे चारही नाल्यांवर उंच पुलाचे बांधकाम करणे आवश्यक आहे.