चकमकीत जवानाचा बळी घेणाऱ्या रघु, जैनीसह चार जहाल माओवाद्यांना अटक
By संजय तिपाले | Updated: April 19, 2025 17:58 IST2025-04-19T17:57:28+5:302025-04-19T17:58:32+5:30
४० लाखांचे होते बक्षीस : पल्ली जंगलात पोलिसांची मोठी कारवाई

Four Maoists arrested including Raghu, Jaini, who killed a soldier in an encounter
संजय तिपाले/गडचिरोली
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील दिरंगी, फुलनार जंगलात चकमकीत सी- ६० जवान महेश नागूलवार यांचा बळी घेणाऱ्या चार जहाल माओवाद्यांना १९ एप्रिल रोजी पोलिसांनी अटक केली. भामरागड तालुक्यातील पल्ली जंगलात ही कारवाई करण्यात आली. जहाल वरिष्ठ माओवादी रघु व पत्नी जैनी या जोडीसह दोन दलम सदस्यांचा यात समावेश आहे. त्यांच्यावर ४० लाखांचे बक्षीस होते.
दक्षिण गडचिरोली विभागीय समिती सदस्य सायलु भुमय्या मुड्डेला ऊर्फ रघु ऊर्फ प्रताप ऊर्फ इरपा (५५ , रा. लिंगापूर, ता. दरपेल्ली, जि. निजामाबाद (तेलंगणा), भामरागड दलमची विभागीय समिती सदस्य व भामरागड एरिया कमिटी सचिव जैनी भीमा खराटम ऊर्फ अखिला ऊर्फ रामे (४१, रा. कंचाला, ता. भोपालपट्टानम, जि. बिजापूर छत्तीसगड) , भामरागड दलम सदस्य झाशी दोघे तलांडी उर्फ गंगू (३०,रा. येचली ता. भामरागड), मनीला पिडो गावडे उर्फ सरिता (२१,रा. कापेवंचा ता. अहेरी ) अशी त्यांची नावे आहेत.
भामरागड तालुक्यातील ताडगाव पोलिस ठाणे हद्दीतील पल्ली जंगलात काही माओवादी फिरत आहेत, अशी माहिती मिळाल्यावरुन ताडगाव ठाण्याचे पोलिस पथक व राज्य राखीव दलाच्या ०९ बटालियनच्या कंपनीने १९ रोजी संयुक्त मोहीम राबवली. त्यानंतर या चौघांना अटक केली. ११ फेब्रुवारी २०२५ रोजी दिरंगी-फुलनार जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये सी- ६० जवान महेश नागूलवार यांना प्राण गमवावा लागला होता. या चकमकीत या चौघांचा प्रत्यक्ष सहभाग होता. विशेष पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान)संदीप पाटील, उप-महानिरीक्षक अंकित गोयल, उप-महानिरीक्षक (अभियान) अजय कुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, ०९ बटालियनचे कमांडंट शंभू कुमार, अपर अधीक्षक यतीश देशमुख, एम. रमेश, सत्य साई कार्तिक, उपअधीक्षक विशाल नागरगोजे , अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पाडली.
दाम्पत्याच्या गुन्ह्यांची शंभरी
अटकेतील वरिष्ठ जहाल माओवादी रघु व त्याची पत्नी जैनी यांच्यावर अनुक्रमे ७७ व २९ असे एकूण १०६ गुन्हे नोंद आहेत.
रघुने १९९० मध्ये सिरनापल्ली दलममधून सदस्य पदावरुन काम सुरु केले होते तर जैनीने पेरमिली दलममधून सदस्य पदावर भरती होऊन २००१ मध्ये नक्षल चळवळीतील कारकीर्द सुरु केली. नक्षलमध्ये महत्त्वाच्या गुन्हे कारवाया करुन त्यांनी पदोन्नती मिळवून विभागीय समिती सदस्यपदापर्यंत मजल मारली होती. दलम सदस्य झाशी दोघे व मनिल पिडो यांच्यावरही अनुक्रमे १४ व ११ गुन्हे नोंद आहेत.