मिलिंद तेलतुंबडेसह चार नक्षल नेत्यांचा घेतला वेध
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 06:17 AM2021-11-15T06:17:28+5:302021-11-15T06:19:34+5:30
१६ मृतदेहांची ओळख पटली, २ डिव्हिजनल कमांडर्सचा समावेश
गडचिरोली : तब्बल साडेतीन वर्षांनंतर गडचिरोलीपोलिसांना नक्षलविरोधी अभियानात सर्वांत मोठे यश मिळवून देणाऱ्या शनिवारच्या चकमकीत मारल्या गेलेल्या २६ पैकी १६ नक्षलींची ओळख पटली असून, त्यात नक्षल्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य मिलिंद तेलतुंबडे याचाही समावेश असल्याची माहिती गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. शहरी नक्षलवाद्यांना झटकाही कारवाई म्हणजे जंगलातीलच नाही, तर शहरी भागात काम करणाऱ्या नक्षलवाद्यांसाठी जोरदार झटका आहे. या कारवाईमुळे देशात गडचिरोली आणि महाराष्ट्र पोलिसांची मान उंचावली गेली आहे, अशी भावना गडचिरोली-गोंदिया क्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केली.
सहा नक्षली महिलांचा समावेश
nमृत नक्षलींमध्ये सहा महिला नक्षलवादी आहेत. त्यातील एकीची ओळख पटली आहे.
nती तेलतुंबडेची बॉडीगार्ड म्हणून काम करणारी विमला ऊर्फ इमला ऊर्फ कमला
ऊर्फ मान्सो बोगा (पीसीसीएम) असून तिच्यावर ८ लाखांचे बक्षीस राज्य शासनाने ठेवले होते.
nइतर पाच महिला आणि पाच पुरुष
नक्षलवाद्यांची ओळख पटलेली नाही.
मृतांच्या शिरावर होती बक्षिसे
मिलिंद तेलतुंबडे याच्याव्यतिरिक्त मृतांमध्ये नक्षलवाद्यांच्या विभागीय समितीचा सदस्य (डीव्हीसीएम) आणि कंपनी ४ चा कमांडर लोकेश ऊर्फ मंगू मडकाम (बक्षीस २० लाख रुपये), कसनसूर दलममध्ये कार्यरत विभागीय समिती सदस्य महेश ऊर्फ शिवाजी गोटा (बक्षीस १६ लाख रुपये), कोरची दलम कमांडर किशन ऊर्फ जैमन (बक्षीस ८ लाख), कसनसूर दलम कमांडर सन्नू ऊर्फ कोवाची (बक्षीस ८ लाख) आणि मिलिंद तेलतुंबडेचा बॉडीगार्ड भगतसिंग ऊर्फ प्रदीप ऊर्फ तिलक जाळे (बक्षीस ६ लाख) यांचाही समावेश आहे.
मिलिंद तेलतुंबडेच्या शिरावर
५० लाखांचे तर १६ नक्षलींवर मिळून एकूण १ कोटी ५४ लाख रुपयांचे बक्षीस होते. उर्वरित १० नक्षलींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
अत्याधुनिक रायफल्ससह शस्रसाठा जप्त
घटनास्थळी पोलीस पथकाला पाच एके-४७ रायफली, एक एकेएम युबिजिअल, नऊ एसएलआर रायफली, तीन ३०३ रायफली, नऊ २.२ सिंगल बोअर पिस्तुल, एक इन्सास रायफल, एक पिस्तुल आणि मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडली.