चार नक्षलवाद्यांचे गडचिरोलीत आत्मसमर्पण; एका महिलेचाही समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 03:35 PM2021-03-23T15:35:02+5:302021-03-23T15:36:27+5:30

Gadchiroli News नक्षलवाद्यांच्या प्लाटून ७ च्या कमांडरसह एकूण ४ जहाल नक्षलवाद्यांनी मंगळवारी (दि.२३) गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले.

Four Naxalites surrender in Gadchiroli | चार नक्षलवाद्यांचे गडचिरोलीत आत्मसमर्पण; एका महिलेचाही समावेश

चार नक्षलवाद्यांचे गडचिरोलीत आत्मसमर्पण; एका महिलेचाही समावेश

googlenewsNext
ठळक मुद्देप्लाटून कमांडरसह एका महिलेचा समावेश२२ लाखांचे होते बक्षीसखून-जाळपोळीसह अनेक गुन्ह्यांची नोंद

 लोकमत न्यूज नेटवर्क  

गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या प्लाटून ७ च्या कमांडरसह एकूण ४ जहाल नक्षलवाद्यांनी मंगळवारी (दि.२३) गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. त्या सर्वांवर अनेक गुन्हे दाखल असून त्यांच्यावर राज्य शासनाने एकूण २२ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. या चार नक्षलवाद्यांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी शांततेचे प्रतीक असलेला पांढरा दुपट्टा आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक समीर शेख (प्रशासन) आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया (ऑपरेशन) प्रामुख्याने उपस्थित होते. वर्ष २०२१ मध्ये गडचिरोलीतील हे पहिलेच आत्मसमर्पण आहे. या चारही जणांना शासनाच्या आत्मसमर्पण योजनेनुसार लाभ देऊन त्यांचे पुनर्वसन केले जाईल, असे पोलीस अधीक्षक गोयल यांनी सांगितले. चकमकीत ठार होण्याची भिती आणि हिंसाचाराच्या अस्थिर जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवादी आत्मसमर्पणाचा मार्ग निवडत असल्याचे ते म्हणाले. २०१९ पासून आतापर्यंत ३७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

असे आहेत आत्मसमर्पित नक्षलवादी

- दिनेश उर्फ दयाराम गंगरू नैताम (२८) हा मुळचा धानाेरा तालुक्यातील पुलकडो येथील रहिवासी आहे. डिसेंबर २००६ मध्ये (वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी) टिपागड दलममध्ये सदस्य म्हणून तो भरती झाला होता. टिपागड, चातगाव दलमनंतर त्याला भामरागड दलममध्ये पाठविण्यात आले. २०१० मध्ये एसीएम तर २०१८ मध्ये कमांडर म्हणून त्याची पदोन्नती झाली. २०२१ ला प्लाटून ७ चे गठण होऊन तो प्लाटून कमांडर झाला. त्याच्यावर चकमकीचे ११ गुन्हे, खुनाचे ६, जाळपोळीचे ३ गुन्हे आहेत. त्याच्यावर ८ लाखांचे बक्षीस ठेवले होते.

- नकुल उर्फ सुखालुराम डुमा मडावी (३५) हा छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यातील कोहका येथील मूळ रहिवासी आहे. सप्टेंबर २००२ मध्ये तो टिपागड दलममध्ये भरती झाला. नंतर प्लाटून ३ चा सेक्शन उपकमांडर व नंतर कमांडर म्हणून कार्यरत होता. यादरम्यान २००७ मध्ये नक्षल सदस्य निला कुमरे हिच्यासोबत त्याने लग्नही केले. त्याच्यावर चकमकीचे ९ गुन्हे, खुनाचे ४, जाळपोळीचे ५ आणि भूसुरूंग स्फोटाचा एक गुन्हा दाखल आहे. त्याच्यावरही ८ लाखांचे बक्षीस होते.

- निला रूषी कुमरे (३४) ही मुळची एटापल्ली तालुक्यातील एटावाही येथील रहिवासी आहे. ती २००५ मध्ये कसनसूर दलममध्ये भरती झाली. सेक्शन १ च्या कमांडरसोबत तिने पुढे लग्न केले. ते दोघेही कसनसूर दलममध्ये कार्यरत होते. तिच्यावर चकमकीचे ३ गुन्हे, खुनाचे ३, जाळपोळीचे ४ गुन्हे दाखल असून तिच्यावर २ लाखांचे बक्षीस ठेवले होते.

- शरद उर्फ रमेश उर्फ गोविंदा सामजी आतला (२६) हा मूळचा धानोरा तालुक्यातील पुस्तोला येथील रहिवासी आहे. जानेवारी २०११ मध्ये तो चातगाव दलममध्ये सदस्य म्हणून भरतील झाला. सप्टेंबर २०१९ मध्ये त्याची पीपीसीएम पदावर पदोन्नती होऊन नोव्हेंबर २०२० पर्यंत तो त्या पदावर कार्यरत होता. त्याच्यावर चकमकीचे ६ गुन्हे आणि खुनाचे २ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर ४ लाखांचे बक्षीस होते.

Web Title: Four Naxalites surrender in Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.