जिल्हा विकासासाठी चार हजार कोटींचा निधी प्रस्तावित
By admin | Published: October 12, 2015 01:45 AM2015-10-12T01:45:28+5:302015-10-12T01:45:28+5:30
डावी उजवी विचारसरणी या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यासाठी केंद्र शासनाने सुमारे ३ हजार ९४२ कोटी रूपये प्रस्तावित केले ...
पत्रकार परिषद : अशोक नेते यांची माहिती
एटापल्ली/सिरोंचा/आलापल्ली : डावी उजवी विचारसरणी या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यासाठी केंद्र शासनाने सुमारे ३ हजार ९४२ कोटी रूपये प्रस्तावित केले असून काही दिवसात मंजुरी मिळताच विकासकामांना सुरूवात होईल, अशी माहिती खासदार अशोक नेते यांनी एटापल्ली, सिरोंचा, आलापल्ली येथे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान दिली.
केंद्र शासनाने सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत चांगल्या योजना सुरू केल्या आहेत. या योजनांची माहिती घेऊन योजनांचा लाभ घेतल्यास विकासाची दारे मोकळी होण्यास मदत होईल. गडचिरोली जिल्ह्यात पाच सिंचन बंधारे मंजूर करून घेतले आहेत. चिचडोह येथील सिंचन योजनेचे काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात लहान-लहान उद्योग सुरू होणार असून सर्वांना रोजगार उपलब्ध होणार आहे. डावी उजवी विचारसरणीचा शिकार गडचिरोली जिल्हा बनला आहे. ही विचारसरणी ज्या जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे त्या जिल्ह्यांचा विकास रखडला आहे. ही बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाने या जिल्ह्यांसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्याचे धोरण अवलंबिले आहे.
या अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला ३ हजार ९४२ कोटी रूपये उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यातून विकास कामे होण्यास फार मोठी मदत होईल. सुरजागड प्रकल्प चालू झाला तर आष्टी येथे २०० ते ३०० एकर जागा खरेदी करून प्रकल्प सुरू केला जाईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत सुरजागड प्रकल्प बाहेर जिल्ह्यात जाऊ दिल्या जाणार नाही, अशी माहिती दिली. पत्रकार परिषदेला बाबुराव कोहळे, रविंद्र ओल्लालवार, विनोद आकनपल्लीवार आदी उपस्थित होते.