चार हजारांवर घरकूल अपूर्ण
By admin | Published: December 28, 2016 02:58 AM2016-12-28T02:58:14+5:302016-12-28T02:58:14+5:30
इंदिरा आवास योजनेंतर्गत शासनाने सन २०१५-१६ या वर्षात गडचिरोली जिल्ह्याला एकूण ४ हजार ८६८ घरकूल बांधण्याचे उद्दिष्ट दिले.
इंदिरा आवास योजना : जिल्ह्यात बांधकामाची गती मंदावलेलीच
गडचिरोली : इंदिरा आवास योजनेंतर्गत शासनाने सन २०१५-१६ या वर्षात गडचिरोली जिल्ह्याला एकूण ४ हजार ८६८ घरकूल बांधण्याचे उद्दिष्ट दिले. तेवढेच घरकूल मंजूरही करण्यात आले. मात्र आतापर्यंत केवळ ७५० घरकुलांचे काम पूर्ण झाले असून अद्यापही ४ हजार ११८ घरकुलांचे काम अपूर्ण स्थितीत आहेत.
इंदिरा आवास योजनेंतर्गत गेल्या चार-पाच वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात घरकूल मंजूर केले जात आहेत. सदर घरकूल बांधकामासाठी शासनाकडून एक लाख रूपयांचे अनुदान लाभार्थ्यांना दिले जाते. घर बांधकामाची स्थिती पाहून टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांना घरकुलाच्या अनुदानाची रक्कम अदा केली जाते. घरकूल बांधकामाच्या प्रक्रियेवर जिल्हा विकास ग्रामीण यंत्रणा व पंचायत समिती प्रशासन लक्ष ठेवून असते. गरीब कुटुंबांना निवासासाठी हक्काचे घर मिळावे, या उद्देशाने शासनाने इंदिरा आवास योजना कार्यान्वित केली. मात्र लाभार्थ्यांमध्ये उदासिनता असल्याने गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात घरकूल बांधकामात गती नसल्याचे दिसून येते. सन २०१५-१६ या वर्षात इंदिरा आवास योजनेंतर्गत अहेरी तालुक्यातील गावांमध्ये १ हजार ९३, आरमोरी २११, भामरागड १५१, चामोर्शी ७७८, देसाईगंज ७६, धानोरा ४२३, एटापल्ली १५२, गडचिरोली ७०३, कोरची २७३, कुरखेडा ४४०, मुलचेरा २९० व सिरोंचा तालुक्यात २७८ घरकूल उद्दिष्टानुसार मंजूर करण्यात आले. यापैकी केवळ ७५० घरकुलांचे काम पूर्ण झाले असून याची टक्केवारी १४.५४ आहे. काही महिने लाभार्थ्यांपुढे बांधकाम साहित्याची अडचण होती. (स्थानिक प्रतिनिधी)
जुने घरकूलही अर्धवट स्थितीत
सन २०१२-१३ व २०१३-१४ या आर्थिक वर्षात गडचिरोली जिल्ह्यात इंदिरा आवास योजनेंतर्गत हजारो घरकूल मंजूर करण्यात आले. यापैकी निम्म्या घरकुलाचे बांधकाम अद्यापही अर्धवट स्थितीत असल्याचे दिसून येते. सन २०१२-१३ ते २०१५-१६ या तीन वर्षात केंवळ १० हजार ५७० घरकुलांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. सदर तीन वर्षात एकूण १६ हजार ९२७ घरकूल मंजूर करण्यात आले. या कामांवर कोट्यवधी रूपयांचा खर्चही झाला आहे.