निधीअभावी चार पाणी पुरवठा योजना रखडल्या
By Admin | Published: May 12, 2016 01:27 AM2016-05-12T01:27:37+5:302016-05-12T01:27:37+5:30
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातील कुरूड, येनापूर, कुनघाडा व अहेरी-नागेपल्ली या चार नळ पाणी पुरवठा योजनांना ...
५० गावांवर जलसंकट : मुख्यमंत्री पाणी योजनेतून निधीचा पत्ता नाही
गडचिरोली : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातील कुरूड, येनापूर, कुनघाडा व अहेरी-नागेपल्ली या चार नळ पाणी पुरवठा योजनांना गडचिरोली जिल्हा परिषदेने मंजुरी प्रदान केली आहे. शासनाकडूनही या पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मात्र या योजनांना मुख्यमंत्री पाणी पुरवठा योजनेतून निधी न मिळाल्याने सदर चारही योजना रखडल्या आहेत. परिणामी ५० वर गावात पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.
चामोर्शी तालुक्यातील कुरूड येथील नळ योजना १८ गावे तर येनापूर येथील नळ योजना १६ गावांसाठी नियोजित करण्यात आली. याशिवाय कुनघाडा व अहेरी-नागेपल्ली नळ योजनेत अनेक गावांचा समावेश आहे. सदर चारही योजना तत्कालीन जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या कार्यकाळात आखण्यात आल्या. मात्र त्यांनी स्वाक्षरी न केल्याने सदर पाणी योजना जिल्हा परिषदेत रखडल्या होत्या. दरम्यान जिल्हा परिषदेचे बांधकाम, वित्त व नियोजन सभापती अतुल गण्यारपवार यांनी विद्यमान जि.प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांच्याकडे या चारही योजनांसंदर्भात वारंवार पाठपुरावा केला. याची दखल घेत जि.प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांनी या चारही योजनांवर स्वाक्षऱ्या करून राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला.
राज्य शासनाने या चार योजनांना प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. मात्र निधीअभावी या चार योजनांचे काम अद्यापही सुरू होऊ शकले नाही. गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विद्यमान भाजप सरकारने नवी मुख्यमंत्री पाणी पुरवठा योजना अंमलात आणली. मात्र या योजनेंतर्गत निधीची मागणी करूनही राज्य सरकारने चामोर्शी व अहेरी या तालुक्यातील चार पाणी योजनांना निधी उपलब्ध करून दिलेला नाही. त्यामुळे गावकऱ्यांना अशुध्द पाणी पिण्याची वेळ आली आहे. अनेकदा या योजनांकरिता निधीची मागणी करण्यात आली. परंतु शासनाचे दुर्लक्ष आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
आघाडी सरकारच्या काळात असलेल्या पाणी पुरवठा योजनेला बंद करून नव्या सरकारने मुख्यमंत्री पाणी पुरवठा योजना सुरू केली. मात्र अजुनही या योजनेतून नव्या पाणी पुरवठा योजनेसाठी निधीची तरतूद झालेली नाही. गडचिरोली जिल्ह्यातील चार पाणी पुरवठा योजना निधी अभावी रखडून पडलेल्या आहे. जिल्हास्तरावर झालेल्या अनेक बैठकीत याबाबत निधीची मागणी करण्यात आली. परंतु दुर्लक्ष केले जात आहे. तत्काळ निधी उपलब्ध करून या चारही योजना मार्गी लावाव्या.
- अतुल गण्यारपवार, बांधकाम व नियोजन सभापती जि.प. गडचिरोली