चारचाकी वाहन जळून खाक
By Admin | Published: May 12, 2016 01:33 AM2016-05-12T01:33:27+5:302016-05-12T01:33:27+5:30
सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली येथून पातागुड्डमकडे ३० ते ३५ तेंदू मजूर प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या चारचाकी वाहनाला आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.
३५ प्रवासी बचावले : तेंदू मजुरांचे नुकसान
आसरअल्ली : सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली येथून पातागुड्डमकडे ३० ते ३५ तेंदू मजूर प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या चारचाकी वाहनाला आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
क्रिष्णमराजू रामराजू जजदायी यांच्या मालकीचे सदर टाटासुमो वाहन आहे. एमएच ३३ एजी ६२१८ हे टाटा सुमो वाहन आसरअल्ली येथून पातागुड्डमकडे तेंदू मजुरांना बसवून वाहतूक करीत होती. दरम्यान आसरअल्लीपासून दोन किमी अंतरावर शॉटसर्किट झाल्याने वाहनाला आग लागली. सदर प्रकार लक्षात येताच वाहनचालकाने वाहन तिथेच थांबविले. दरम्यान, प्रवाशांनी गाडीतून उडी मारून स्वत:ला वाचविले. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार या टाटासुमो वाहनात ३० ते ३५ प्रवासी बसले होते. गुरूवारपासून आसरअल्ली भागात तेंदू संकलनाच्या कामाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे परिसरातील खेडेगावातील तेंदू मजूर बाजारातून गहू, तांदूळ, किराणा साहित्य खरेदी करून साहित्यासह गावाकडे निघाले. वाहनाला लागलेल्या मजुरांचे सर्व साहित्य जळून खाक झाले. परिणामी या घटनेमुळे मजुरांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. आसरअल्ली-पातागुड्डमदरम्यान मार्गावरील वाहतुकीवर असलेल्या अनेक खासगी वाहने भंगार स्थितीत आहेत. अशा भंगार वाहनामधून क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक होत आहे. मात्र याकडे पोलीस विभागाचे दुर्लक्ष होत आहे. तसेच खासगी वाहतुकीला उधाण आल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाचे प्रचंड नुकसान होत आहे.