लुटारूंना चार वर्षांचा कारावास
By admin | Published: June 25, 2017 01:31 AM2017-06-25T01:31:18+5:302017-06-25T01:31:18+5:30
शस्त्राचा धाक दाखवून चोरी करणाऱ्या चोरट्यांना सिरोंचा न्यायालयान चार वर्ष सश्रम कारावास व प्रत्येक दोन
सिरोंचा न्यायालयाचा निकाल : दोन हजार रूपये दंड
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : शस्त्राचा धाक दाखवून चोरी करणाऱ्या चोरट्यांना सिरोंचा न्यायालयान चार वर्ष सश्रम कारावास व प्रत्येक दोन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
गांधी व्यंकटी लाटकरी (३५) रा. मोटलाटेकडा, राजबापू पोदासमय्या कुमरी (२२) रा. लक्ष्मीपूर, संतोष पोचम गोदारी (२०) रा. मक्कीडगुटा, शंकर मलय्या कावेरी (४०) रा. मक्कीडगुटा असे शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. सिरोंचा तालुक्यातील नंदीगाव येथील श्रीनिवास रामचंद्रराव गुंटूपल्ली हे मागील सहा वर्षांपासून नंदीगाव येथे वास्तव्यास आहेत. त्यांची नंदीगाव व लक्ष्मीपूर येथे ३२ एकर शेती आहे. त्यांनी आपल्या शेतीचा सौदा केला होता. त्यांच्याकडे मोटी रक्कम असल्याचे हेरून आरोपींनी शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडून नगदी ८ हजार रूपये, मोबाईल, दोन टॉर्च, मोबाईल चार्जर असा १८ हजार रूपयांचा माल चोरी केला. याबाबतची तक्रार सिरोंचा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. पोलिसांनी आरोपींना अटक करून तपास केला असता, त्यांच्याकडे चोरलेल्या साहित्यासह एक भरमार बंदूक आढळून आली. तपास पूर्ण झाल्यानंतर सदर केस सिरोंचा न्यायालयात दाखल केली.
न्यायालयाने दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकून घेऊन आरोपींना भादंवि कलम ३९४, भा.ह.का. सह कलम ३/२५ अन्वये दोषी ठरवून चार वर्षांचा सश्रम कारावास व एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास सिरोंचा पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक दीपक लुकडे, पोलीस हवालदार नरेंद्र दुबे, पोलीस शिपाई राकेश करमे, नायक पोलीस शिपाई समय्या आलाम यांनी केला.