भामरागड चौथ्या दिवशीही पुराच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 11:53 PM2019-09-09T23:53:12+5:302019-09-09T23:53:30+5:30
छत्तीसगडकडून इंद्रावती नदीचा प्रवाह वाढल्याने पर्लकोटाचे पाणी पुढे जाण्याऐवजी गावात शिरले. त्यामुळे सोमवारीही २५ ते ३० टक्के भामरागड पाण्यात होते. घरांसोबतच या भागातील नागरिकांच्या शेतातील पीकही खरडून गेले आहे. शेतात अडकलेल्या काही नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने रिस्क बोटने जाऊन सुरक्षितपणे बाहेर काढले. या भागातील पाऊस मंदावला असला तरी छत्तीसगडकडून येणारी इंद्रावती नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : गेल्या चार दिवसांपासून पर्लकोटा नदीचे पाणी भामरागडमध्ये शिरल्याने बेघर झालेल्या नागरिकांना प्रशासनाने आश्रय देत त्यांची राहण्याची व जेवणाची आणि पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था केली आहे. पुराचे पाणी अजूनही गावातून निघालेले नसल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
छत्तीसगडकडून इंद्रावती नदीचा प्रवाह वाढल्याने पर्लकोटाचे पाणी पुढे जाण्याऐवजी गावात शिरले. त्यामुळे सोमवारीही २५ ते ३० टक्के भामरागड पाण्यात होते. घरांसोबतच या भागातील नागरिकांच्या शेतातील पीकही खरडून गेले आहे. शेतात अडकलेल्या काही नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने रिस्क बोटने जाऊन सुरक्षितपणे बाहेर काढले. या भागातील पाऊस मंदावला असला तरी छत्तीसगडकडून येणारी इंद्रावती नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहात आहे. त्यामुळे भामरागडमधील परिस्थिती गेल्या चार दिवसांपासून ‘जैसे थे’ आहे.
आतापर्यंत ६०० लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात महसूल व पोलीस विभागाला यश आले आहे. बºयाच कुटुंबांचे कपडे, घरातील सामान वाहून गेले. चार दिवसांपासून दूरध्वनी, भ्रमणध्वणी, वीज पुरवठा खंडित होता. तहसीलदार कैलास अंडिल यांनी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केल्याने दरम्यान सोमवारी भ्रमणध्वनी आणि वीज पुरवठा सुरू करण्यात यश आले.
तहसीलदार अंडिल यांच्यासह एसडीपीओ डॉ.कुणाल सोनवाने यांनी स्वत: हजर राहून ज्या-ज्या ठिकाणी लोकांना आश्रय दिला त्या ठिकाणी जेवणाची, राहण्याची व्यवस्था पाहिली. तसेच प्रयास महिला स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकारी शीला येंपलवार, भारती इष्टम, प्रीती मडावी, सुनंदा आत्राम, गौरी उईके, तारा मडावी, कुटो मडावी, अर्पणा सडमेक, ठुगे मडावी, निर्मला सडमेक आदींनी देखील हातभार लावला.
अजूनही ते लोक पूरग्रस्त नाही!
भामरागडवासिय पुरामुळे अभूतपूर्व अशा बिकट परिस्थितीत असताना अद्याप लोकप्रतिनिधींनी तिथे जाऊन पूरग्रस्तांना दिलासा दिलेला नाही. यापूर्वीच्या पुरानंतर आ.अम्ब्रिशराव आत्राम यांनी भेट दिली होती, पण आताच्या भिषण परिस्थितीनंतर पालकमंत्र्यांनी येऊन पूरग्रस्तांना कायमस्वरूपी दिलासा द्यावा अशी अपेक्षा केली जात आहे. विशेष म्हणजे अजूनही हे पूरग्रस्त शासकीय रेकॉर्डमध्ये ‘पूरग्रस्त’ नाहीत. त्यामुळे ते निकषानुसार मिळणाºया मदतीपासून वंचित आहेत.