शेतकऱ्यांची लुट, युरियाच्या बॅगमागे विक्रेत्यांची नफेखोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 03:06 PM2024-10-01T15:06:34+5:302024-10-01T15:08:11+5:30
कारवाईची मागणी : कृषी विभाग ढिम्म, भरारी पथके नावालाच
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नियमानुसार रासायनिक खते, बियाणांची विक्री न करणे, स्टॉक बुक न बाळगणे व रेट बोर्ड न लावणे आदींसह विविध प्रकारची अनियमितता कृषी सेवा केंद्रांमध्ये आढळून येते; परंतु तरीही नियमाला न जुमानता कृषी केंद्रचालक युरिया व अन्य रासायनिक खतांची चढत्या भावात विक्री करतात. यावर कृषी विभागाकडून नरमाईची भूमिका घेतली जात असल्याने त्यांचे फावते.
सध्या अधिक मुदतीच्या धानाला शेतकरी युरियाची मात्रा देत आहेत. अशातच काही ठिकाणाहून युरियाची विक्री १०० रुपये अधिक किमतीत करीत आहेत. म्हणजेच २६६ रुपयांऐवजी ३५० ते ३६० रुपये घेतले जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे. यावर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
खरपुंडी, पोर्ला परिसरात ३५० रुपयाला युरियाची विक्री
गडचिरोली तालुक्यातील खरपुंडी तसेच पोर्ला येथे ३५० रुपयाला युरियाची एक बॅग विक्री केली जाते. याशिवाय अन्य रासायनिक खतेसुद्धा चढत्या भावात विक्री केले जातात. शेतकऱ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर कारवाई करणे गरजेचे आहे.
विक्रीबंदीचे आदेश नावालाच
भरारी पथकाने तपासणी केलेल्या व सदोष व अनियमितता आढळलेल्या एकूण १७ केंद्रांना विक्रीबंदीचे आदेश सुरुवातीच्या हंगामात देण्यात आलेले होते. हे आदेश दीर्घ काळासाठी नसतात. त्यामुळे पुन्हा विक्रीचे आदेश बहाल केले जातात. किमान एक वर्षतरी बंदी घातल्यास शेतकऱ्यांची लूट करण्याची केंद्रचालकांची हिंमत होणार नाही.
हंगामापूर्वी कारवाई; नंतर नरमाई
- खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यातील कृषी केंद्रांवर दि. २६ जून रोजी तपासणी करून २७ जून रोजी कारवाई करण्यात आली. यात दोन कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले, तर २३ केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले.
- गडचिरोली तालुक्यातील १८ रासायनिक 3 खतेविक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर देसाईगंज तालुक्यातील देसाईगंज व कोकडी येथील दोन केंद्रांचे रासायनिक खते परवाने रद्द करण्यात आले.
- याशिवाय याच तालुक्यातील कोकडी येथील ३ व देसाईगंज येथील एक असे खतांचे चार व देसाईगंज येथील बियाणांचा एक परवाना निलंबित करण्यात आला होता.