फसवणूक झालेल्या ग्राहकांना आता मिळणार लवकरात लवकर न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2022 09:05 PM2022-02-21T21:05:58+5:302022-02-21T21:06:41+5:30

Gadchiroli News ग्राहक तक्रार निवारण मंचावरील तक्रारींचा ताण कमी करून ग्राहकांना लवकर न्याय मिळण्यासाठी आता मध्यस्थी कक्ष सुरू करण्यात आले आहेत.

Fraudulent customers will now get justice as soon as possible | फसवणूक झालेल्या ग्राहकांना आता मिळणार लवकरात लवकर न्याय

फसवणूक झालेल्या ग्राहकांना आता मिळणार लवकरात लवकर न्याय

googlenewsNext
ठळक मुद्देआयोगाकडे येणाऱ्या प्रकरणांसाठी जिल्ह्या-जिल्ह्यांत मध्यस्थी कक्ष

गडचिरोली : विविध क्षेत्रातील ग्राहकांची फसवणूक झाल्यास त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हास्तरावर ग्राहक तक्रार निवारण मंच (आता आयोग) आहे. त्यांच्याकडील तक्रारींचा ताण कमी करून ग्राहकांना लवकर न्याय मिळण्यासाठी आता मध्यस्थी कक्षही सुरू करण्यात आले आहेत. यामुळे ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांना आता लवकर धडा मिळणार आहे.

कोणत्याही वस्तू खरेदीपासून ते मालमत्ता खरेदीपर्यंत, तसेच विविध प्रकारच्या विमा कंपन्या, वाहतूक व्यवस्था अशा अनेक सेवांमध्ये संबंधित व्यक्ती सेवेतील त्रुटींसाठी संबंधितांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभी करू शकते; पण ग्राहक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर चालणाऱ्या न्यायिक प्रक्रियेत वेळ जातो. त्यामुळे आलेल्या तक्रारीनुसार त्या प्रकरणात कोण चुकीचे आहे, ग्राहक आयोग त्यावर कोणता निर्णय घेऊ शकते, आदी मुद्दे तपासून दोन्ही पक्षांच्या सहमतीने प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न मध्यस्थी कक्षातून होणार आहे.

दहाजणांचे पॅनेल परस्पर मिटविणार तक्रारी

- मध्यस्थी कक्षात दहा वकिलांचे पॅनेल राहणार आहे. ग्राहक आयोगाकडे तक्रार आल्यानंतर ती या पॅनेलकडे पाठविली जाईल. त्यांना एक महिन्याचा अवधी दिला जाईल. ते दोन्ही पक्षकारांना प्रकरणाबद्दल समजावून सांगतील. त्यामुळे पक्षकारांचा वेळ आणि आरोपी ठरणाऱ्यांवरील दंडात्मक कारवाई टाळली जाऊन तक्रारकर्त्यालाही लवकर न्याय मिळेल.

- विशेष म्हणजे २०१९ च्या ग्राहक कायद्यातील सुधारणेनुसार आता कोणत्याही ठिकाणचे प्रकरण कोणत्याही जिल्ह्यातील ग्राहक आयोगाकडे दाखल करता येते. ग्राहकांना ५० लाखांपर्यंतची नुकसानभरपाई मिळवून देण्याचा अधिकार या आयोगाला असल्याचे जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्ष अतुल आळशी यांनी सांगितले.

२०१९ च्या नवीन कायद्यामुळे आणि त्यातील सुधारणांमुळे ग्राहकांच्या दृष्टीने अनेक नवीन बदल झाले आहेत. नागरिकांना याबद्दलची माहिती आणि जनजागृती होणे गरजेचे आहे. प्रत्येक जिल्हास्तरावर सुरू होत असलेल्या नवीन मध्यस्थी कक्षामध्ये वैद्यकीय सेवांची प्रकरणे सोडल्यास सर्व प्रकरणे तडजोड व परस्पर सामंजस्यातून निकाली निघू शकतील.

- डॉ. संतोष काकडे, प्र. अध्यक्ष, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग

Web Title: Fraudulent customers will now get justice as soon as possible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.