पदव्युत्तर शैक्षणिक अभ्यासक्रमाला मिळणार निःशुल्क प्रवेश; गोंडवाना विद्यापीठ ठरले राज्यात पहिले
By गेापाल लाजुरकर | Published: August 19, 2023 04:53 PM2023-08-19T16:53:26+5:302023-08-19T16:58:46+5:30
या सत्रापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी
गडचिरोली : विद्यार्थ्यांचे कौशल्य जगासमोर आणण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरिता मागील सत्राप्रमाणे या वर्षीही पदव्युत्तर शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशाकरिता मोफत प्रवेश सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देणारे गोंडवाना विद्यापीठ हे यावर्षीही राज्यातील पहिले विद्यापीठ ठरले आहे. तसेच या सत्रापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी गोंडवाना विद्यापीठाने केली आहे.
गोंडवाना विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटला अधिकाअधिक महत्त्व देत स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिले जात आहे. विद्यार्थ्यांना विद्यापीठापर्यंत येण्यास त्रास होऊ नये, यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये प्रवेशाकरिता विशेष कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत. तसेच विद्यार्थी सुविधा केंद्र श्री शंकरराव बेझलवार आर्ट अँड कॉमर्स महाविद्यालय अहेरी आणि शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय तुकुम, चंद्रपूर येथे नियमित प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. एम.ए. इंग्रजी, समाजशास्त्र, इतिहास, उपयोजित अर्थशास्त्र, मराठी, जनसंवाद, एम.कॉम. एमएससी गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, संगणक शास्त्र, या सर्व अभ्यासक्रमाच्या सत्र २०२३-२४ च्या प्रथम वर्षाकरिता मोफत प्रवेश देणारे गोंडवाना विद्यापीठ राज्यातील पहिले विद्यापीठ आहे.
विद्यार्थ्यांसाठी विशेष योजना
विद्यार्थ्यांना गडचिरोली बसस्थानक ते गोंडवाना विद्यापीठापर्यंत प्रवासासाठी बसची सुविधाही करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करून त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश तसेच ‘क्रांतिवीर बाबूराव सेडमाके कमवा आणि शिका’ योजने अंतर्गत त्यांना आर्थिक मदत होणार आहे. विद्यापीठात येण्याची व जाण्याची मोफत सोय विद्यापीठ करीत आहे.