आष्टी- मुलचेरा रस्त्यावर वाघाचा मुक्त संचार; लोहारा परिसरात दवंडी देऊन सतर्कतेचा इशारा
By संजय तिपाले | Published: November 6, 2023 07:59 PM2023-11-06T19:59:43+5:302023-11-06T19:59:52+5:30
नागरिकांत भीती
गडचिरोली: आष्टी- मुलचेरा मार्गावर वाघाचा मुक्त संचार असल्याचे उघडकीस आले आहे. लोहारा जंगलक्षेत्राजवळ हा वाघ काही प्रवाशांना ५ नोव्हेंबरला सायंकाळी रस्ता ओलांडताना आढळला. वाघाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रसारित झाला आहे.
चौडमपल्ली वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येत असलेल्या चपराळा अभयारण्याच्या लोहारा क्षेत्रात या वाघाचा संचार असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी या वाघाने एका शेतकऱ्यावर हल्ला केला होता, त्यानंतर दुसऱ्या दिवशी गायीला लक्ष्य केले होते. आष्टी- मुलचेरा मार्गावरील लोहारा येथे रस्ता ओलांडताना वाघाचे छायाचित्र प्रवाशांनी कॅमेऱ्यात टिपले. हा वाघ आष्टी, मार्कंडा या भागातही येऊ शकतो, असा वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर जंगलात काही ठिकाणी कॅमेरे लावण्यात आले आहेत. दरम्यान, लोहारा व परिसरातील गावांत दवंडी देऊन सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
नागरिकांनी शेतात जाताना काळजी घ्यावी तसेच रात्री एकटे घराबाहेर जाऊ नये. सतर्कता बाळगावी. वाघाचा शोध घेण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावलेले आहेत. - गणेश लांडगे, चौडमपल्ली वनपरिक्षेत्र