ठाणेगाव-वैरागड मार्गावर वाघाचा मुक्तसंचार, कारचालकाच्या कॅमेऱ्यात छबी कैद
By गेापाल लाजुरकर | Published: October 14, 2023 10:06 PM2023-10-14T22:06:53+5:302023-10-14T22:07:11+5:30
पाच ते सात मिनिटे त्या रस्त्यावरून हाेणारी वाहतूक होती बंद
गाेपाल लाजूरकर, गडचिराेली: आरमाेरी तालुक्याच्या ठाणेगाव-वैरागड मार्गावर शनिवारी सकाळी वाघाचा मुक्त संचार दिसून आला. वाघ रस्त्याच्या कडेने जात हाेता. त्यामुळे पाच ते सात मिनिटे येथून हाेणार वाहतूक बंद हाेती. एका कारचालकाने कारमधून व्हिडीओ रेकाॅर्ड करून ताे साेशल मीडियावर व्हायरल केला.
भर दिवसा वाघ रस्त्यावर येत असल्याने येथून ये-जा करणाऱ्या लाेकांना धाेका हाेण्याची शक्यता आहे.रामाळा-वैरागडच्या जंगलात वाघाची जाेडी २९ सप्टेंबर राेजी रात्री आढळली हाेती. तेव्हापासून रामाळा-वैरागड मार्ग सायंकाळी ५ वाजतापासून दुसऱ्या दिवशीच्या सकाळी ९ वाजतापर्यंत रहदारीसाठी बंद केला. त्यामुळे ठाणेगाव-वैरागड मार्गे रहदारी वाढली. त्यातही ह्या मार्गावर अधूनमधून वाघाचे दर्शन लाेकांना हाेतच आहे. अशातच शनिवारी सकाळी ठाणेगाव-वैरागडमार्गे वाहनधारकांना वाघाचा मुक्तसंचार पाहायला मिळाला. वाघ दिसताच दाेन्ही बाजूंनी येणारी वाहने राेखली. अनेकांनी दुचाकी माघारी फिरवल्या. रस्त्याच्या कडेने वाघ काही अंतर चालून जंगलात निघून गेला.
शेतातील कामे करावी कशी?
सध्या हलके धान पीक कापणीचे काम सुरू आहे. अशास्थितीत जंगलालगत शेती असलेल्या शेतकऱ्यांनी शेतात कामे करावी कशी, असा प्रश्न आहे. जंगलालगत शेती कसणारे शेतकरी व शेतमजुरांवर वाघ हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही.