आरमोरीमध्ये रस्त्यावर रानटी हत्तीचा मुक्त संचार; भीतीने वाहने थांबली
By संजय तिपाले | Published: August 9, 2023 05:32 PM2023-08-09T17:32:10+5:302023-08-09T17:33:53+5:30
कुरखेडा तालुक्यात केली होती घरांची तोडफोड
गडचिरोली : कुरखेडा तालुक्यात धुडगूस घालणाऱ्या रानटी हत्तीचा आरमोरी येथे रस्त्यावर मुक्त संचार करत असल्याचा एक व्हिडिओ ९ ऑगस्टला समोर आला. हत्तीने रस्ता ओलांडेपर्यंत वाहने थांबली होती. याच दरम्यान एका प्रवाशाने हत्तीचा व्हिडिओ घेतला.
जिल्ह्यात रानटी हत्तींचा उपद्रव नवीन नाही. यापूर्वी कोरची, कुरखेडा तालुक्यात या हत्तींनी मोठ्या प्रमाणात धुडगूस घालून नुकसान केलेले आहे. गेल्या आठवड्यात कुरखेडा येथे काही घरांची तोडफोड केली तसेच धानपिकात मिरवल्याने मोठे नुकसान केले. २३ हत्तींच्या कळपातील भरकटलेल्या एका हत्तीने आरमोरीत ठाण मांडले आहे. आरमोरी रस्त्यावर या हत्तीचा मुक्त संचार असल्याने प्रवाशांची त्रेधा उडाली. समोरुन डौलात आलेला हत्ती पाहून वाहने रोखून धरली, त्यानंतर हत्ती वाट वाकडी करुन जंगलात निघून गेला, त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या हत्तीचा वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करावा, तसेच भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
तुटपुंजी भरपाई
घरांचीे तोडफोड केल्यावर वनविभागाकडून जेमतेम पाच हजार रुपये नुकसान भरपाई दिली जाते. भरपाईच्या रक्कमेत वाढ करावी, अशी मागणी आमदार कृष्णा गजबे यांनी विधानसभेत केली. यासाठी शासननिर्णय घ्यावा व भरपाईच्या रक्कमेत वाढ करुन नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.