जमीन हस्तांतरणाचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 01:23 AM2018-06-30T01:23:21+5:302018-06-30T01:24:43+5:30
गडचिरोली शहरापासून चार किमी अंतरावर असलेल्या अडपल्ली येथील शेतकऱ्यांची १९२ एकर जमीन विद्यापीठासाठी खरेदी केली जाणार आहे. त्यापैकी १०० एकर जमिनीच्या खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली शहरापासून चार किमी अंतरावर असलेल्या अडपल्ली येथील शेतकऱ्यांची १९२ एकर जमीन विद्यापीठासाठी खरेदी केली जाणार आहे. त्यापैकी १०० एकर जमिनीच्या खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
विद्यापीठाने चामोर्शी मार्गावरील सेमाना देवस्थान परिसरातील वन जमीन मिळावी, यासाठी अर्थ व वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारात नियोजन आराखडा तयार केला. परंतु हा प्रयत्न फसला. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने कुलगुरू डॉ. कल्याणकर यांच्या पुढाकारात शहरालगत असलेल्या मूल मार्गावरील कोटगल, पुलखल, कनेरी, पारडी परिसरात जमिनीचा शोध घेतला. त्यानंतरही धानोरा मार्गावरील लांझेडा परिसरातही जमिनीचा शोध घेण्यात आला. येथेही पुरेशा प्रमाणात जमीन उपलब्ध होऊ शकली नाही.
हे प्रयत्न करुन थकल्यानंतर गोगाव येथील मूळचे रहिवासी असलेले डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांच्याशी कुलगुरूंनी संपर्क साधून जमीन विद्यापीठाला देण्याची मागणी केली, ते तयार झाले. त्यानंतर कुलगुरू डॉ. कल्याणकर यांनी अडपल्ली परिसरात ज्या शेतकºयांच्या जमिनी आहेत त्या सर्व शेतकºयांशी वैयक्तिक संपर्क करून विद्यापीठाला जमीन देण्याची विनंती केली. त्यांनी कुलगुरूंची विनंती मान्य करीत जमीन देण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने नियोजन आराखडा तयार करून राज्याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सादर केला. दरम्यानच्या काळात राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या जमिनीची पाहणी करून तत्काळ निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली व निधीही उपलब्ध करून दिला.
विद्यापीठ प्रशासनाने अडपल्ली परिसरातील १९२ एकर जमिनीचे हस्तांतर करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. यापैकी पहिल्या टप्यात १०० एकर जमिनीची संपूर्ण कार्यवाही पार पाडण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरीत जमिनीची कार्यवाही करण्यात येणार आहे.