नऊ हजार विद्यार्थिनींचा मोफत प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 01:08 AM2018-12-15T01:08:16+5:302018-12-15T01:09:04+5:30

राज्य शासनामार्फत अहिल्याबाई होळकर त्रैमासिक पास योजना व मानव विकास मिशनच्या बसेस चालविल्या जातात. या दोन्ही योजनेंतर्गत विद्यार्थिनींना मोफत बस प्रवासाची सवलत दिली जाते.

Free travel to nine thousand students | नऊ हजार विद्यार्थिनींचा मोफत प्रवास

नऊ हजार विद्यार्थिनींचा मोफत प्रवास

Next
ठळक मुद्देपास सवलत : अहिल्याबाई होळकर व मानव विकास योजना, तालुकास्तरावरील शाळांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्य शासनामार्फत अहिल्याबाई होळकर त्रैमासिक पास योजना व मानव विकास मिशनच्या बसेस चालविल्या जातात. या दोन्ही योजनेंतर्गत विद्यार्थिनींना मोफत बस प्रवासाची सवलत दिली जाते. चालू शैक्षणिक वर्षात गडचिरोली जिल्ह्यातील ८ हजार ६२४ विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ दिला जात आहे.
मुलांच्या तुलनेत मुलींचे शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. गावाजवळ शाळा राहत नसल्याने बसने प्रवास करावा लागतो. बहुतांश पालकांकडे बसची तिकीट देण्याचीही क्षमता राहत नाही. अशावेळी विद्यार्थिनींची शाळा बंद केली जाते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी शासनाने विद्यार्थिनींसाठी अहिल्याबाई होळकर त्रैमासिक पास योजना व मानव विकास मिशनची बस योजना सुरू केली आहे. त्यापैकी अहिल्याबाई होळकर त्रैमासिक पास योजनाही संपूर्ण राज्यात सुरू आहे. या योजनेंतर्गत पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास उपलब्ध करून दिली जाते. गडचिरोली आगारातून २ हजार ९४२ तर अहेरी आगारातून १ हजार ३५९ विद्यार्थिनी या योजनेचा लाभ घेत शिक्षण घेत आहेत. मोफत बससेवा उपलब्ध असल्याने १० ते १५ किलोमीटरवरून विद्यार्थिनी तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येत आहेत.
राज्यातील ज्या तालुक्यांचा मानव विकास निर्देशांक कमी आहे, अशा तालुक्यातील विद्यार्थिनींसाठी शासनाने स्वतंत्र बस उपलब्ध करून दिल्या जातात. सदर बसेस शाळांच्या व पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार संबंधित मार्गावर चालवून विद्यार्थिनींची ने-आण करतात. याही योजनेमध्ये विद्यार्थिनींना मोफत पास उपलब्ध करून दिली जाते. मानव विकास मिशन अंतर्गत आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना लाभ दिला जातो. गडचिरोली आगाराला मानव विकास मिशनने ४९ बसेस तर अहेरी आगाराला ४२ बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींचा प्रवास सुकर करण्यात या बसेसची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे.
या दोन्ही योजनेमुळे विद्यार्थिनींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर बहुतांश मुली तालुका व जिल्हास्थळी शिक्षण घेण्यासाठी येत असल्याने विद्यार्थिनींचे शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे.
आता पाचवी ते बारावीपर्यंत सवलत
मागील वर्षीपर्यंत अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना मोफत बसपास योजनेचा लाभ दिला जात होता. आॅक्टोबर महिन्यापासून आता पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ दिला जात आहे. विशेष म्हणजे, अकरावी, बारावीचे शिक्षण तालुका, जिल्हा किंवा मोठ्या गावांमध्येच उपलब्ध आहे. कधीकधी सदर ठिकाण गावापासून १५ ते २० किमी राहत असल्याने अनेक विद्यार्थिनी दहावीनंतर शाळा सोडत होत्या. मात्र बारावीपर्यंत मोफत बस सवलत योजना लागू केल्याने बारावीपर्यंतचे शिक्षण घेणाºया विद्यार्थिनींची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे.
 

Web Title: Free travel to nine thousand students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.