नऊ हजार विद्यार्थिनींचा मोफत प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 06:00 AM2019-12-15T06:00:00+5:302019-12-15T06:00:31+5:30
गडचिरोली जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे. यामागील मुख्य कारण शिक्षणाचे प्रमाण कमी हे आहे. शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केला जात आहे. मानव विकास मिशन अंतर्गत गडचिरोली आगाराला ४९ तर अहेरी आगाराला ४२ बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मानव विकास मिशन व अहिल्याबाई होळकर योजनंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील पाचवी ते बारावीपर्यंतच्या सुमारे ९ हजार १५६ विद्यार्थिनी मोफत प्रवासाचा लाभ घेत आहेत.
राज्यात मुलांच्या तुलनेत मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. तसेच गळतीचे प्रमाणही अधिक आहे. लहान गावात चवथीपर्यंत तर मोठ्या गावात सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. पाचवी नंतरच्या शाळा मोठ्या गावातच आहेत. दुसऱ्या गावी शाळा असल्याने बहुतांश विद्यार्थिनी चवथीनंतर शाळा सोडत होत्या. मुले सायकलने जात असले तरी मुली सायकलने प्रवास करण्यास धजावत नाही. विद्यार्थिनींना बसने मोफत प्रवास करता यावा यासाठी राज्य शासनाने अहिल्याबाई होळकर मोफत बस पास योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत बस पास उपलब्ध करून दिल्या जातात. ही योजना राज्यभरातील विद्यार्थिनींसाठी लागू आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील ४ हजार ९६१ विद्यार्थिंनींना दिला जात आहे.
गडचिरोली जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे. यामागील मुख्य कारण शिक्षणाचे प्रमाण कमी हे आहे. शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केला जात आहे. मानव विकास मिशन अंतर्गत गडचिरोली आगाराला ४९ तर अहेरी आगाराला ४२ बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. या बसेस विद्यार्थिनींची शाळा ते गाव या दरम्यान शाळा भरणे व सुटण्याच्या वेळेत चालविल्या जातात. मानव विकास मिशनच्या बसमधून जिल्ह्यातील एकूण ४ हजार २४० विद्यार्थिनींची वाहतूक केली जाते. देसाईगंज तालुका वगळता जिल्ह्यातील इतर सर्वच तालुक्यांमध्ये मानव विकास मिशनच्या बसेसची सेवा दिली जाते. बसचा खर्च म्हणून शासन प्रत्येक महिन्याला एका बससाठी ६४ हजार रूपये अनुदान उपलब्ध करून देते.
विद्यार्थिनींच्या तुलनेत बसेस अपुऱ्या
२०११ मध्ये मानव विकास मिशनच्या बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या. मागील आठ वर्षात शिक्षण घेणाºया विद्यार्थिनींची संख्या वाढली आहे. त्यामुळे मानव विकास मिशनच्या बसमध्ये विद्यार्थिनींची गर्दी होते. तसेच काही मार्गावर अजुनही बस धावत नाही. अधिकच्या बसेस उपलब्ध झाल्यास नवीन मार्गांवर बसेस चालवून विद्यार्थिनींची वाहतूक करण्यास मदत होईल. शासनाने बसेस उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.