मोफत गणवेश योजनेचे नियोजन थंडबस्त्यातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 11:26 PM2018-06-11T23:26:08+5:302018-06-11T23:26:08+5:30
राज्याच्या शालेय शिक्षण विभागामार्फत गतवर्षी प्रमाणे यंदाही मोफत गणवेश योजना राबविण्यात येणार आहे. मात्र सदर योजना यंदा कशा पद्धतीने राबवावी, याबाबतच्या मार्गदर्शक सूचना शासनाकडून जि.प. प्रशासनाला अद्यापही प्राप्त झाल्या नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्याच्या शालेय शिक्षण विभागामार्फत गतवर्षी प्रमाणे यंदाही मोफत गणवेश योजना राबविण्यात येणार आहे. मात्र सदर योजना यंदा कशा पद्धतीने राबवावी, याबाबतच्या मार्गदर्शक सूचना शासनाकडून जि.प. प्रशासनाला अद्यापही प्राप्त झाल्या नाही. त्यामुळे सदर योजनेच्या अंमलबजावणीबाबतचे शिक्षण विभागाचे नियोजन थंडबस्त्यात असल्याचे दिसून येत आहे.
सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत जि.प. प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने गतवर्षी मोफत गणवेश योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला. जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सदर योजनेअंतर्गत शालेय गणवेश उपलब्ध करून दिला जातो. गतवर्षी शासनाच्या आदेशानुसार गणवेशाच्या अनुदानाची रक्कम अदा करण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांचे संयुक्त बँक खाते काढण्यात आले. मात्र बँक व शिक्षण विभागाच्या दिरंगाईमुळे तसेच लाभार्थ्यांच्या उदासीनतेमुळे बँक खाते काढण्याची प्रक्रिया बरेच दिवस लांबली होती. ‘आधी गणवेश खरेदी करा, नंतर अनुदान मिळेल’ असे सरकारचे धोरण गतवर्षी असल्याने ही योजना विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापकांसह शिक्षकांसाठीही कटकटीची ठरली होती.
सन २०१८-१९ हे शैक्षणिक सत्र २६ जून २०१८ पासून सुरू होणार आहे. विद्यार्थी शाळा प्रवेशाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या शैक्षणिक सत्रातही समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना योजनेअंतर्गत गणवेश उपलब्ध करून द्यावयाचे आहेत. मात्र शासनाकडून मार्गदर्शक सूचना न आल्याने जि.प. प्रशासनाच्या वतीने नियोजनाची कार्यवाही सध्या थंडबस्त्यात आहे.
यासंदर्भात प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी उरकुडे यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनी भ्रमणध्वनीला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे याबाबत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेता आली नाही.
विद्यार्थ्यांचे खाते उघडण्याचे गटशिक्षणाधिकाऱ्यांना निर्देश
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वतीने गणवेश योजनेबाबत जि.प. शिक्षण विभागाला आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना मिळत असतात. मात्र आगामी शैक्षणिक सत्रात ही योजना राबविण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या नाही. असे असले तरी जिल्ह्यातील सर्व पं.स. स्तरावरील गटशिक्षणाधिकाºयांनी बँक खाते नसलेल्या विद्यार्थ्यांचे खाते उघडावेत, असे निर्देश सर्व बीओंना मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाºयांमार्फत देण्यात आले आहे. तसे पत्र एप्रिल महिन्यात देण्यात आले. इयत्ता पहिली व इतर खासगी शाळांमधून जि.प.च्या शाळेत नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्याची कार्यवाही सुरू आहे.
गतवर्षी ६१ हजार विद्यार्थ्यांना मिळाला योजनेचा लाभ
सर्वशिक्षा अभियानांतर्गत गतवर्षी सन २०१७-१८ या शैक्षणिक सत्रात बाराही तालुक्यातील एकूण १ हजार ५७३ शाळांमधील एकूण ६३ हजार ५७८ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ द्यावयाचा होता. यापैकी प्रत्यक्ष गणवेश खरेदी केलेल्या ६१ हजार १०८ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला. त्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम वळती करण्यात आली, अशी माहिती जि.प. शिक्षण विभागाकडून मिळाली आहे.