तेलंगणाच्या एसटी बसमध्ये सर्व प्रवाशांसाठी माेफत पाणी

By दिगांबर जवादे | Published: April 29, 2024 05:29 PM2024-04-29T17:29:58+5:302024-04-29T17:31:29+5:30

Gadchiroli : चालकाची अशीही सेवा

Free water for all passengers in ST buses of Telangana | तेलंगणाच्या एसटी बसमध्ये सर्व प्रवाशांसाठी माेफत पाणी

Drinking water Facility by a Bus driver

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली :
उन्हाची दाहकता वाढत असल्याने पाण्याची प्रत्येक जिवाला पाण्याची गरज भासते. मात्र, वेळेवर पाणी मिळेलच याची शाश्वती नाही. बसमधून लांबपल्ल्याचा प्रवास करताना तर प्रवाशांचे घसे काेरडे पडते. यावर उपाय म्हणून तेलंगणा राज्यातील काेमरमबीम जिल्ह्यातील कागजनगर एसटी डेपाेच्या लक्ष्मण दुर्गम चालकाने प्लास्टिक कॅनच्या माध्यमातून एसटीतच प्रवासी व स्वत:साठी पिण्याच्या पाण्याची साेय केली आहे. त्याच्या या उपक्रमाचे राज्यभर काैतुक हाेत आहे.


एसटी बसने प्रामुख्याने मध्यमवर्गीय व गरीब नागरिक प्रवास करतात. २० रुपयांची पाण्याची बाॅटल सर्वच ठिकाणी उपलब्ध हाेत असली तरी पाण्यासाठी तेवढे पैसे माेजण्याची ऐपत प्रत्येकच एसटी प्रवाशाची राहतेच अशी नाही. बरेचसे प्रवासी बस थांबल्यानंतर हाॅटेलमध्ये जाऊन पाणी पितात. त्या ठिकाणचे पाणी शुद्ध राहीलच याची शाश्वती नाही. कधी-कधी तर गरम पाणीसुद्धा प्यावे लागते. कधी-कधी तर हाॅटेल मालक एखादी वस्तू खरेदी केल्याशिवाय पाणी पिऊ देत नाही, अशी स्थिती असते. त्यामुळे लक्ष्मण दुर्गम या चालकाने एसटीमध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पाणी थंड राहावे म्हणून प्लास्टिकच्या कॅनला पाेते गुंडाळले आहे. कॅनला ताेटी बसविली आहे. सर्वांसाठी पाणी असे तेलगूमध्ये लिहिले आहे. प्रवाशांच्या बाजूनेच कॅन ठेवली असते.

 

अहेरीचे प्रवासीही पितात पाणी
कागजनगर डेपाेतून काही बस अहेरीसाठी साेडल्या जातात. बहुतांशवेळा लक्ष्मण दुर्गमची ड्यूटी लागल्यास साेबत कॅन घेऊन येताे. त्यामुळे अहेरीच्या प्रवाशांनाही पाण्याची सुविधा हाेते.

ज्या बसमध्ये लक्ष्मण त्या बसमध्ये पाणी

ज्या बसमध्ये लक्ष्मण दुर्गम या चालकाची ड्यूटी लागते त्या बसमध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध हाेते. मागील अनेक वर्षांपासून लक्ष्मण दुर्गम हा पाण्याची सेवा प्रवाशांना देत आहे. त्यामुळे कागजनगर आगारात ताे ‘वाॅटर मॅन’ म्हणून ओळखला जाताे. त्याच्या या अनाेख्या उपक्रमाचे कागजनगर, अहेरी तालुक्यात काैतुक हाेत आहे. 


विशेष म्हणजे, पाण्याची कॅन ताे स्वत:च्या केबिनमध्ये न ठेवता प्रवाशांच्या दिशेने ठेवताे. सदर कॅनवर सर्वांसाठी पाणी असे लिहिले असल्याने प्रवासी बिनधास्तपणे पाणी पितात.

पाणी पाजणे हे सर्वांत माेठे पुण्य असल्याचे आपल्या पूर्वजांनी शिकविले आहे. पाण्यासाठी फार खर्च करावा लागत नाही. ज्या बसमध्ये माझी ड्यूटी लागते त्या बसमध्ये साेबत कॅन घेऊन जाताे. त्याच कॅनचे मी सुद्धा पाणी पिताे.
- लक्ष्मण दुर्गम, एसटी चालक

 

Web Title: Free water for all passengers in ST buses of Telangana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.