आठ दिवसांपासून ठाणेगाव परिसरातील वीज पुरवठा वारंवार खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:33 AM2021-04-05T04:33:06+5:302021-04-05T04:33:06+5:30
आरमोरी येथील वीज वितरण विभागाच्या पाॅवर स्टेशनमध्ये ४ एप्रिल राेजी झालेल्या चर्चेत आ. कृष्णा गजबे यांनी उपविभागीय अभियंता सचिन ...
आरमोरी येथील वीज वितरण विभागाच्या पाॅवर स्टेशनमध्ये ४ एप्रिल राेजी झालेल्या चर्चेत आ. कृष्णा गजबे यांनी उपविभागीय अभियंता सचिन बोबडे आणि शहर विभागाचे अभियंता विवेक बोरकर यांच्याशी चर्चा केली. आरमोरी पाॅवर स्टेशनच्या माध्यमातून तालुक्यात वीज वितरण होते. मात्र गेल्या आठ दिवसांपासून ठाणेगाव, डोंगरगाव, देऊळगाव, शिवणी, जोगिसाखरा, कासवी, पळसगाव या परिसरात वीज समस्या निर्माण झाली आहे. विद्युत पुरवठा वारंवार खंडित हाेताे. नागरिकांना अंधारातून वाट काढावी लागते. सध्या धान पीक, मका, तसेच भाजीपाल्याची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. पिकाला सध्या पाण्याची गरज आहे. शेतकरी विद्युत पंपाच्या साहाय्याने पाण्याचा उपसा करून पिकाला पाणी देतात. मात्र गेल्या आठ दिवसांपासून या परिसरातील विद्युतपुरवठा वारंवार खंडित हाेत आहे. याची तक्रार शेतकऱ्यांनी आ. कृष्णा गजबे यांच्याकडे केली. या तक्रारीची दखल घेत आ. गजबे यांनी आरमोरी येथे वीज वितरण विभागाचे कार्यालय गाठले आणि तेथून ते थेट पाॅवर हाऊस गाठून अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. दरम्यान अभियंता बोबडे व बोरकर यांनी ठाणेगाव, डोंगरगाव, सायगाव, शिवणी येथील शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना गडचिरोली मुख्यालयातून वीजपुरवठा हाेत असल्याचे सांगितले. मुख्य वाहिनीवर काही तांत्रिक बिघाड आला होता. हा बिघाड आम्ही काही प्रमाणात दुरुस्त केलेला आहे. दोन दिवसात ही समस्या निकाली काढू असे सांगितले. यावेळी पंकज खरवडे, जितेंद्र ठाकरे, संजय सोनटक्के, अमोल खेडकर व कर्मचारी उपस्थित होते.
बाॅक्स
ठाणेगाव येथे ३३ केव्ही उपकेंद्र होणार
आरमाेरी तालुक्यातील ठाणेगाव येथील वीज समस्या साेडविण्यासाठी ठाणेगाव येथे ३३ केव्ही उपकेंद्र मंजूर झाले आहे. काही दिवसातच त्याचे काम सुरू हाेणार आहे. उपकेंद्र निर्माण झाल्यास परिसरातील विजेची समस्या मार्गी लागेल. तसेच आरमोरी येथील वीजसमस्या दूर करण्याकरिता लवकरच गांगलवाडी येथून विद्युत पुरवठा होणार आहे. विद्युत वाहिनीचे काम सुरू झाले आहे. येत्या काळात आरमोरीसुद्धा विजेच्या समस्येपासून मुक्त हाेईल,अशी माहिती आ. कृष्णा गजबे यांनी दिली.