संतप्त पानठेलाचालकांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 01:18 AM2018-02-10T01:18:30+5:302018-02-10T01:19:46+5:30
अन्न व औषध प्रशासन व पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने गेल्या १५ दिवसांपासून धाडसत्र राबवून अनेक पानठेलाधारकांवर कारवाई करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अन्न व औषध प्रशासन व पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने गेल्या १५ दिवसांपासून धाडसत्र राबवून अनेक पानठेलाधारकांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे कारवाईच्या भितीपोटी गडचिरोली शहरातील पानठेले बंद ठेवण्यात आले आहेत. रोजगार हिरावलेल्या अन्यायग्रस्त पानठेलाधारकांना न्याय मिळण्याच्या मागणीसाठी शिवसेना व शेतकरी कामगार पक्षाच्या बॅनरखाली शेकडो पानठेलाधारकांचा मोर्चा शुक्रवारी तहसील कार्यालयावर धडकला.
तहसीलदार दामोधर भोयर यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस विभागाच्या जप्तीच्या धाडसत्रामुळे पानठेलाधारकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. पानठेले बंद असल्याने रोजगार बंद झाल्याने कुटुंबाचे पालन पोषण कसे करायचे असा प्रश्न पानठेला चालकांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्व पानठेला चालकांच्या कुटुंबाच्या पालन पोषणाची जबाबदारी असल्याने सदरची अन्यायग्रस्त कारवाई तत्काळ बंद करण्यात यावी, तंबाखुजन्य पदार्थ प्रतिबंधक कायदा २००३ च्या तरतुदीला अधिन राहून पानठेलाधारकांना तत्काळ पानठेले सुरू करण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या मोर्चात शिवसेना जिल्हा प्रमुखासह शिवसेनेचे गडचिरोली शहर प्रमुख रामकिरीत यादव, ज्ञानेश्वर बगमारे, नंदू कुमरे, संतोष मारगोनवार, शेकापचे रामदास जराते, रोहिदास कुमरे तसेच दिलीप चांदेकर, संतोष चापले, सुनिल ब्राह्मणवाडे, सुरज उप्पलवार, साईनाथ अलोणे, अशोक लोणारे, हेमंत कोटगले, गजानन निकुरे, उमेश वंजारी, विनोद हुलके, शुभम देवलवार, बंडू निंबोरकर, दीपक बाबनवाडे, संजय रामटेके, नरेश भैसारे, अतीश जेल्लेवार, सुनिल कोंडावार, रामू झाडे, प्रभाकर शेंडे, नितीन कोतकोंडावार, शरद हेडाऊ, देवेंद्र बांबोळे, ऋषी उंदीरवाडे, सलीम पठाण, वसीम खान, आकाश चौधरी, अमोल चौधरी, वासुदेव मडावी, विठ्ठल किरमे, गिरीधर नैताम, सुनील मुळे आदीसह गडचिरोली शहरातील शेकडो पानठेलाधारक सहभागी झाले होते.
याप्रसंगी रामदास जराते व इतर पदाधिकाºयांनी तहसीलदार भोयर यांच्याशी चर्चा करून पानठेलाधारकांवर ओढावलेल्या बेरोजगारीची समस्या प्रकर्षाने मांडली. यावर प्रशासनाने तोडगा काढावा, अशी मागणी यावेळी केली.
न्याय न मिळाल्यास जिल्हा कचेरीवर मोर्चा
तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंधक कायदा २००३ च्या तरतुदीच्या अधिन राहून पानठेलाधारक आपला व्यवसाय करतील, कोणीही सुगंधीत तंबाखू विकणार नाही. त्यामुळे प्रशासनाने पानठेले सुरू करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. न्याय न मिळाल्यास हजारो पानठेलाधारकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.