राकाँंतर्फे इंधन दरवाढीचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 01:28 AM2018-06-07T01:28:46+5:302018-06-07T01:28:46+5:30
मागील काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल, गॅस आदींसह जीवनावश्यक वस्तूंचे दर झपाट्याने वाढत आहे. याचा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून शासनाने इंधन दरवाढ व महागाई नियंत्रणात आणावी, अशी मागणी करीत केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांचा निषेध करून शासनाला निवेदन पाठविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : मागील काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल, गॅस आदींसह जीवनावश्यक वस्तूंचे दर झपाट्याने वाढत आहे. याचा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून शासनाने इंधन दरवाढ व महागाई नियंत्रणात आणावी, अशी मागणी करीत केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांचा निषेध करून शासनाला निवेदन पाठविले.
सिरोंचा येथे राष्टÑवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने बुधवारी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. गेल्या वर्षभरात गॅसच्या किंमती १९ वेळा वाढल्या. तर पेट्रोल, डिझेलच्या किमती दररोज वाढवून किंचित कमी केल्या जात आहेत. पेट्रोल ८६ रूपये तर डिझेल ७३ रूपयांच्या आसपास आहे. पेट्रोल व डिझेलची दरवाढ करून सरकार सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करीत आहे. सध्या जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. त्यामुळे शासनाने इंधन दरवाढ मागे घ्यावी, अन्यायी कर मागे घेऊन दरवाढ कमी करावी, पेट्रोल, डिझेलचे दर दररोज ठरविणे बंद करावे, गॅसचे दर कमी करावे, अशी मागणी करण्यात आली.
शासनाच्या जनविरोधी धोरणामुळे भाववाढ झाली आहे, असा आरोपही राष्टÑवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला. त्यानंतर राकाँचे तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लुरी यांच्या नेतृत्वात भाजप सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. त्यानंतर तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लुरी, तालुका उपाध्यक्ष सत्यम पिडगू, सचिव उज्ज्वल तिवारी, पालारपू नारायण, गर्कापेठाचे माजी सरपंच आसम डोबा, येमा मलय्या, राकाँ सेवा दलाचे तालुकाध्यक्ष संतोष नागुला, गर्कापेठाचे माजी उपसरपंच दुर्गम सोमय्या, कैलास जिमडे व राष्टÑवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.