निधीचा ओघ वाढला मात्र कामे रेंगाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 11:01 PM2018-09-17T23:01:46+5:302018-09-17T23:02:30+5:30
मागील दोन वर्षात नगर परिषदेला निधीचा ओघ सुरू झाला आहे. मात्र प्रत्यक्षात कामांना सुरूवात झाली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. नुकताच विविध योजनांतर्गत नगर परिषदेने दोन कोटी रूपयांच्या कामांची निविदा काढली आहे. सदर कामे सुरू होण्यास आणखी किती दिवसाचा कालावधी लागेल. याबाबत नागरिक अनभीज्ञ आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मागील दोन वर्षात नगर परिषदेला निधीचा ओघ सुरू झाला आहे. मात्र प्रत्यक्षात कामांना सुरूवात झाली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. नुकताच विविध योजनांतर्गत नगर परिषदेने दोन कोटी रूपयांच्या कामांची निविदा काढली आहे. सदर कामे सुरू होण्यास आणखी किती दिवसाचा कालावधी लागेल. याबाबत नागरिक अनभीज्ञ आहेत.
नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान दिलेले आश्वासन पाळत राज्याचे मुख्यमंत्री, वित्तमंत्री यांनी गडचिरोली नगर परिषदेला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे.
नगर परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याने नागरिकांमध्येही चर्चेचा विषय बनला आहे. मात्र या निधीचे नियोजन करण्यात नगर परिषदेचे पदाधिकारी व सदस्य अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. काही कामांच्या निविदा निघाल्या आहेत. तर काही निधीचे नियोजन करण्याचे काम सुरूच आहे. नगर परिषदेच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते.
नगर परिषदेतून निघालेली फाईल कधीकधी जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक महिने पडून राहते. मात्र त्याचा पाठपुरावा नगर परिषद पदाधिकाऱ्यांकडून घेतला जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उपलब्ध निधीबाबतचे जरी रेकॉर्ड नगर परिषद तोडत असली तरी कामे मात्र शुन्य असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.
नागरिकांच्या प्रश्नांमुळे नगरसेवक त्रस्त
कामे मंजूर झाल्याची माहिती नगरसेवक नागरिकांना मागील दोन वर्षांपासून देत आहेत. मात्र प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली नाही. यामुळे नागरिक कामाबाबत विचारणा करीत आहेत. याचे उत्तर देताना नगरसेवकांच्या नाकीनऊ येत आहे. दुसरीकडे केबल टाकण्यासाठी रस्ते फोडले जात आहेत. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये नागरिक पडून अपघात होत आहेत. खड्डे हाच विकास होय काय, असा प्रश्न नागरिकांकडून नगरसेवकांना उपस्थित केला जात आहे. यामुळे नगरसेवकही त्रस्त आहेत.
पुन्हा दोन कोटींच्या कामांना मंजुरी
गडचिरोली शहरातील नागरी, अनुसूचित जाती वस्ती सुधार योजना इतर वस्ती सुधार योजना, नगर परिषदेचा निधी व रस्ता अनुदान योजनांमधून दोन कोटी रूपयांची कामे केली जाणार आहेत. याबाबतची निविदा सुध्दा काढण्यात आली आहे. या कामांमध्ये रस्ता, नाली बांधकाम यांचा प्रामुख्याने समावेश आहे. जुनीच कामे अजूनपर्यंत सुरू झाली नाही. त्यामुळे नवीन कामांना काधी सुरूवात होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.